Israel-Iran conflict Oil price :
नवी दिल्ली : इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष सातव्या दिवशीही तीव्र असताना, ऊर्जा बाजारात अस्थिरतेची भीती निर्माण झाली आहे. या आठवड्यात तेलाच्या बाजारात मोठी वाढ झाली. अमेरिका आणि इराण यांच्यात थेट लष्करी संघर्षाच्या शक्यतेने नवीन अस्थिरता निर्माण झाली असून ब्रेंट क्रूडचे दर जवळपास ७७ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत.
होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांच्या मार्गात बदल होण्याची शक्यता असून, यामुळे वाहतूक खर्चही वाढू शकतो. संघर्ष वाढल्यास इराणमधील तेल प्रकल्पांवरही धोका निर्माण होईल. मध्य-पूर्व हा जागतिक तेल व्यापारासाठी एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे आणि वाढत्या किमतींचा परिणाम चलनवाढ, जहाज वाहतूक आणि जगभरातील ऊर्जेच्या उपलब्धतेवर होऊ शकतो. २०१९ मध्ये अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे भारत आता इराणकडून तेल आयात करत नसला तरी, मध्य-पूर्वेतील अशांततेचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसून येतात.
१८ जून रोजी ब्रेंट क्रूडचा दर सुमारे ७७ डॉलरवर पोहोचला, जो एका आठवड्यापूर्वी ६९.४ डॉलर होता. म्हणजेच साप्ताहिक १०.६ टक्क्यांची वाढ.
अस्थिरतेतील वाढ आणि तेजीच्या ऑप्शन ट्रेडिंगमुळे बाजारात काही दिवसांतच ८ डॉलरच्या रेंजमध्ये हेलकावत आहे.
विश्लेषकांच्या मते, ब्रेंटमध्ये आता प्रति बॅरल १० डॉलरचा भू-राजकीय जोखीम प्रीमियम समाविष्ट झाला आहे.
गेल्या शुक्रवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यापासून इराणने रोजच्या तेल निर्यातीमध्ये ४४% वाढ केली आहे.
इराणकडे १५७ अब्ज बॅरल कच्चे तेल आहे, जे मध्य-पूर्वेच्या २४ टक्के आणि जगाच्या १२ टक्के प्रमाणित साठ्याएवढे आहे. हा जगातील नववा सर्वात मोठा तेल उत्पादक देश असून, दररोज ३.३ दशलक्ष बॅरल उत्पादन करतो आणि दोन दशलक्ष बॅरल कच्चे तेल व शुद्ध इंधन निर्यात करतो. अमेरिका इस्रायल-इराण युद्धात थेट सहभागी होण्याच्या शक्यतेचा विचार करत असल्याने या आठवड्यात तेलाच्या किमती वेगाने वाढल्या. एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, निम्मे अमेरिकन इराणला अमेरिकेचा शत्रू मानतात, परंतु ६० टक्के अमेरिकन इस्रायली युद्धात अमेरिकेच्या लष्करी सहभागाच्या विरोधात आहेत.