दुबई; वृत्तसंस्था : मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा बाजारात मोठा बदल पाहायला मिळत आहे. इराणच्या संभाव्य ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांना चकवा देण्यासाठी तेल कंपन्या आणि अमेरिकन नौदलाने ‘डार्क ट्रान्झिटस्’ ही नवी रणनीती अंमलात आणली आहे. यामध्ये तेलवाहू जहाजे आपली ट्रॅकिंग यंत्रणा बंद करून रात्रीच्या अंधारात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत आहेत.
२५ जुलै रोजी ग्रीकच्या मालकीचे महाकाय तेलवाहू जहाज ‘किकू’ कतारच्या मेसैद बंदरातून कच्चे तेल भरून निघाले. हे जहाज होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून ओमानच्या आखातात अचानक पुन्हा ट्रॅकवर दिसू लागले.
ही रणनीती सध्या बाजाराला तारत असली, तरी ती कायमस्वरूपी तोडगा नाही. युद्धाच्या काळात जागतिक तेलसाठ्यातून सुमारे १.९ अब्ज बॅरल्सचा वापर झाला आहे. जागतिक रिफायनरी क्षमतेला मोठा फटका बसला आहे.
ओमानच्या आखातात पोहोचल्यानंतर ‘किकू’ने ‘नेव्ह इलेक्ट्रॉन’ या दुसऱ्या सुपरटँकरमध्ये कच्चे तेल ट्रान्स्फर केले. हे तेल घेऊन ‘नेव्ह इलेक्ट्रॉन’ जहाज चीनच्या निंगबो बंदराकडे रवाना झाले, तर ‘किकू’ पुन्हा एकदा ट्रॅकर बंद करून कतारच्या दिशेने परतले. सध्या होर्मुझमधून होणाऱ्या सुमारे ८० टक्के वाहतुकीत हीच पद्धत वापरली जात आहे. यामुळे विम्याचा खर्च, संभाव्य नुकसानीचा धोका कमी झाला आहे.
ट्रॅकर बंद करून प्रवास : इराणी ड्रोन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी महाकाय तेलवाहू जहाजे ‘एआयएस ट्रान्स्पॉन्डर’ बंद करून होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करत आहेत.
अमेरिकन नौदलाचे संरक्षण : सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि यूएईच्या जहाजांना अमेरिकन नौदलाच्या देखरेखीखाली ओमानच्या आखातापर्यंत पोहोचवले जात आहे.
समुद्रातच तेल हस्तांतरण : सामरिकदृष्ट्या सुरक्षित भागात आल्यानंतर लहान जहाजांमधून दुसऱ्या मोठ्या टँकर्समध्ये कच्चे तेल भरून ते चीन, तैवान, व्हिएतनामसारख्या आशियाई देशांकडे रवाना केले जाते.
जागतिक साठ्यांवर मोठा ताण : हा तात्पुरता उपाय असला, तरी आणीबाणीच्या तेलसाठ्यांमध्ये विक्रमी घट झाली असून, इंधनाचे दर १०० डॉलर्सच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.