पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने २०२४ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर (David Baker), डेमिस हसाबिस (Demis Hassabis) आणि जॉन एम. जम्पर (John M. Jumper) यांना संयुक्तपणे जाहीर केले आहे. डेव्हिड बेकर यांना 'कॉम्प्युटेशनल प्रोटीन डिझाइन'साठी आणि डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांना संयुक्तपणे 'प्रोटीन स्ट्रक्चर प्रेडिक्शन"साठी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला असल्याचे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे.
रसायनशास्त्रातील या वर्षीच्या नोबेल पारितोषिक विजेत्यांनी संगणकीय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (artificial intelligence) प्रोटीन्सची रहस्ये उलगडली आहेत. या रसायनशास्त्रज्ञांचे रासायनिक साधने, प्रोटीन्स पूर्णपणे समजून घेऊन त्यावर प्राविण्य मिळविण्याचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न आता पूर्ण होत आहे. २०२४ चे रसायनशास्त्रातील विजेते डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांनी सर्व ज्ञात प्रोटीन्स स्ट्रक्चरचा अंदाज बांधण्यासाठी AI चा यशस्वीपणे वापर केला. तर डेव्हिड बेकर यांनी जीवनाच्या मूलभूत घटकांवर प्रभुत्व कसे मिळवायचे आणि पूर्णपणे नवीन प्रोटीन्सची निर्मिती कशी करायची? याचे ज्ञान मिळवले आहे. त्याची शोध घेण्याची क्षमता अफाट असल्याचे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने नमूद केले आहे.
काल मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेलची घोषणा करण्यात आली होती. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे (AI) गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे संशोधक जेफ्री हिंटन यांना जॉफ हॉफफिल्ड यांच्या समवेत भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. हिंटन हे कॅनडातील टोरंटो विद्यापीठातील संशोधक आहेत. AIची संरचना ही मानवी मेंदूच्या रचनेची कॉपी केलेली आहे. याला आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क असे म्हटले जाते. यावर हिंटन यांनी मूलभूत संशोधन केलेले आहे.
यंदाचे वैद्यकशास्त्राचे (Physiology) नोबेल (Nobel Prize) अमेरिकेचे व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना जाहीर झाले आहे. मायक्रो आरएनएच्या शोधासाठी दोघे वैद्यकशास्त्रातील नोबेलची मानकरी ठरले आहेत.
शास्त्रज्ञ मौंगी बावेंडी, लुईस ब्रूस आणि अलेक्से एकिमोव यांना २०२३ मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांनी क्वांटम डॉट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अणूंच्या छोट्या क्लस्टरचा शोध लावला होता. ज्याचा वापर आज फ्लॅट स्क्रीन्स, एलईडी दिवे आणि डिव्हासेसमध्ये रंग तयार करण्यासाठी केला जातो. जे शल्यचिकित्सकांना ट्यूमरमधील रक्तवाहिन्या पाहण्यास मदत करतात.