पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप यांनी विजय मिळवला. हा विजय महिलांच्या रिप्रोडक्टिव्ह हक्कांविरोधातला विजय असेही चित्र निर्माण झाले आहे. त्यातून अमेरिकेतील महिलांनी No Sex, No Dating, No Marriage, No Children अशी मोहीम सुरू केली असून पुरुषांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
महिलांची अशी चळवळ सर्वप्रथम दक्षिण कोरियात सुरू झाली होती, याला 4B चळवळ असे नाव दिले गेले आहे. ही चळवळ आता अमेरिकेतही सुरू झाली आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप याचा विजय हा पुरुषांचा विजय म्हणून पाहिला जात आहे. अमेरिकेत गर्भपाताचा अधिकार हा अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचा मुद्दा बनलेला आहे. गर्भपात हा कायदेशीर अधिकार असला पाहिजे, असा मतप्रवाह आहे, याला प्रो-चॉईस असे म्हटले जाते.
तर बलात्कारातून झालेली, आईचे जीवन धोक्यात असणारी गर्भधारणा अशा अपवादात्मक स्थितीतच गर्भपात केला जावा, असा मतप्रवाह आहे, याला प्रो-लाईफ म्हटले जाते. ट्रंप हे प्रो-लाईफ मतप्रवाहाच्या बाजूने आहेत. त्यामुळे ट्रंप यांचा विजय महिलाच्या रिप्रोडक्टिव्ह हक्कांच्या विरोधातील पुरुषांचा विजय म्हणूनही पाहिला जात आहे.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दक्षिण कोरियातील 4B चळवळ काय आहे, याचा अमेरिकेतून सर्च वाढलेला आहे. फक्त ४८ तासात गुगलवर यासंदर्भात ५ लाख सर्च झालेले आहेत. शिवाय टिकटॉक आणि एक्सवर महिला या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे. त्यातून हा अमेरिकेत टॉप ट्रेंड बनला आहे, अशी बातमी इकॉनॉमिक टाइम्सने दिलेली आहे.
२०१८ किंवा २०१९ ही चळवळ दक्षिण कोरियात सुरू झाली. Me Too हा ट्रेंड सुरू झाल्यानंतर दक्षिण कोरियात ही चळवळ सुरू झाली. कोरियन भाषेत Bi याचा अर्थ 'नाही' असा होतो. पुरुषांना डेटिंगसाठी, सेक्ससाठी, मुलांसाठी, विरुद्ध लिंगी संबंधासाठी नाही म्हणा असा या मोहिमेचा अर्थ आहे.