9/11 terrorist attacks | अमेरिकेत ‘ग्राऊंड झीरो’ येथे जगभरातील नागरिकांकडून भावुक श्रद्धांजली 
आंतरराष्ट्रीय

9/11 terrorist attacks | अमेरिकेत ‘ग्राऊंड झीरो’ येथे जगभरातील नागरिकांकडून भावुक श्रद्धांजली

९/११ दहशतवादी हल्ल्याला २५ वर्षे पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : काळाच्या स्मृतीतून कोणताही दिवस तुमचे अस्तित्व पुसून टाकू शकणार नाही... हे व्हर्जिलच्या ‘द एनीड’मधील वाक्य न्यूयॉर्कमधील 'ग्राऊंड झिरो' येथील ९/११ राष्ट्रीय स्मारकावर कोरलेले आहे. अवघ्या २९ मिनिटांच्या अंतराने पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळलेल्या ‘ट्विन टॉवर्स’च्या अवशेषांमधील लोखंडापासून बनवलेल्या १५ इंची अक्षरांमध्ये ही ओळ कोरलेली आहे. अमेरिकेवर झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्याला आता २५ वर्षे पूर्ण झाली असून, जगभरातील लोक आजही त्या काळ्या दिवसाच्या आठवणीने हळहळत आहेत.

मॅनहॅटनमध्ये उभे राहिलेले हे स्मारक पूर्ण होण्यासाठी तब्बल एक दशकाचा काळ लागला. ज्या जागी मूळ दोन टॉवर्स उभे होते, तिथे काळ्या ग्रॅनाईटचे दोन मोठे पाण्याचे हौद तयार करण्यात आले आहेत. चार विमानांच्या अपहरणात प्राण गमावलेल्या सर्व २,९७७ निष्पापांची नावे येथील कांस्य फलकांवर कोरण्यात आली आहेत. गेल्या १५ वर्षांत हे आठ एकरचे स्मारक केवळ एक स्मृतिस्थळ न राहता जगभरातील लोकांसाठी एक ‘धर्मनिरपेक्ष तीर्थक्षेत्र’ बनले आहे.

नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू

हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त विविध देशांतून हजारो नागरिक येथे दाखल झाले आहेत. टोराँटो येथून आलेले कोस्टा अथानासेलिस म्हणाले, येथील शांतता मनाला सुन्न करते. या घटनेने संपूर्ण जग हादरवून सोडले होते.

अर्जेंटिनाच्या ब्यूनस आयर्स येथून आलेल्या अँड्रिया सेमल यांनी २५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. टीव्हीवर विमानांची धडक बसतानाची दृश्ये आजही अंगावर काटा आणतात. आजच्या युद्धांमध्ये निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जातो, हेच यातून दिसते, असे त्या म्हणाल्या. मोरोक्कोहून आलेल्या एका तरुणीने सांगितले, या हल्ल्याने केवळ इमारती पाडल्या नाहीत, तर मानवी मूल्यांचाही विध्वंस केला.

२५ वर्षांनंतरही बदललेले जग

दक्षिण कॅरोलिनाच्या अँथनी क्नेख्ट यांच्या मते, २५ वर्षे उलटूनही जगात दहशतवादाची मुळे तशीच आहेत. आयर्लंडचे ७८ वर्षीय मायकेल टार्नी यांनी या घटनेची तुलना १९१२ च्या टायटॅनिक दुर्घटनेशी करत म्हटले, या एका घटनेने २१ व्या शतकाचा संपूर्ण राजकीय चेहरामोहरा बदलून टाकला. अनेकांसाठी हे आदरांजलीचे ठिकाण आहे, तर काहींसाठी इतिहास समजून घेण्याची जागा. परंतु मानवी इतिहासातील ही काळी जखम अजूनही तितकीच ओली आहे.

स्थानिकांच्या कटू आठवणी

क्वीन्स येथील ७० वर्षीय पामेला आयझॅक जवळच ब्रोकरेज फर्ममध्ये काम करत असत. हल्ल्यानंतर त्या पहिल्यांदाच येथे आल्या होत्या. मी इतकी वर्षे इथे येणे टाळत होते. कारण ती भीती मनात घर करून बसली होती. आज केवळ मृतांना आदर देण्यासाठी मी आले, असे त्यांनी सांगितले. स्पेनच्या नादिया बोगेते यांनी सांगितले की, ज्या मृतांचा वाढदिवस असतो त्यांच्या नावावर ठेवलेली पांढरी कार्नेशन फुले पाहून डोळे पाणावतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT