Nigeria Plane Crash | नायजेरियात वायुदलाचे विमान कोसळून ३२ ठार 
आंतरराष्ट्रीय

Nigeria Plane Crash | नायजेरियात वायुदलाचे विमान कोसळून ३२ ठार

पुढारी वृत्तसेवा

लागोस; वृत्तसंस्था : नैर्ऋत्य नायजेरियातील ओंडो राज्यात सोमवारी नायजेरियन वायुदलाचे एक विमान अचानक कोसळल्याची धक्कादायक दुर्घटना घडली. या विमानातील चालक दलाच्या सदस्यांसह एकूण ३२ जण मरण पावले. अशी अधिकृत माहिती लष्कर आणि देशाच्या नागरी विमान वाहतूकमंत्र्यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

वायुदलाचे प्रवक्ते एहिमेन एजोदामे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान दक्षिण नायजेरियातील बेनिन शहरातून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या लागोसकडे जात होते. ही एक नियमित मोहीम होती. प्रवासादरम्यान ओंडो राज्यातील इग्बोकोडा परिसरावरून जात असताना विमानावरील नियंत्रण सुटले आणि ते खाली कोसळले.

२५ प्रवासी आणि ७ क्रू मेंबर्स विमानामध्ये उपस्थित

नायजेरियाचे विमान वाहतूकमंत्री फेस्टस कियामो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर माहिती शेअर करताना सांगितले, प्राथमिक माहितीनुसार या विमानात २५ प्रवासी आणि ७ क्रू मेंबर्स (चालक दल) असे एकूण ३२ जण मरण पावले. एका नौदल तळाजवळ या विमानाचा ढिगारा आणि अवशेष शोधण्यात यश आले आहे. या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये नदीच्या काठावर नागरिकांची गर्दी जमलेली दिसत असून बचाव पथके बोटींच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम राबवताना दिसून येत आहेत.

आयर्लंडवरून २८ हजार फूट खाली झेपावून लंडनला परतले

लंडन : लंडनहून अमेरिकेतील शिकागो शहराकडे निघालेल्या ब्रिटिश एअरवेजच्या एका प्रवासी विमानाला सोमवारी हवेत अचानक आणीबाणीचा (इमर्जन्सी) सामना करावा लागला. आयर्लंडच्या हवाई हद्दीत असताना या विमानाने अत्यंत वेगाने तब्बल २८,००० फूट खाली झेप घेतली. या गंभीर परिस्थितीमुळे वैमानिकांनी तत्काळ आणीबाणीची घोषणा केली आणि शिकागोला जाणारे हे विमान तातडीने माघारी वळवून लंडनच्या हिथ्रो विमानतळाकडे नेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT