Python Audition नाटकात किंवा चित्रपटात भूमिकेसाठी कलाकारांची ऑडिशन होणे हे नेहमीचेच असते; मात्र न्यूयॉर्कमधील जगप्रसिद्ध 'मेट्रोपॉलिटन ऑपेरा'मध्ये एक अत्यंत वेगळा प्रकार समोर आला आहे. येथे कोणी कलाकारांची नव्हे, तर चक्क अजगरांची रंगमंचावरील एका भूमिकेसाठी ऑडिशन घेण्यात आली.
मोझार्टच्या (Mozart) गाजलेल्या 'कोझी फान तुत्ते' (Così fan tutte) या ऑपेरा सादरीकरणासाठी ही अनोखी निवड प्रक्रिया पार पडली. या ऑपेरामधील एका विशिष्ट दृश्यासाठी जिवंत सापाची आवश्यकता असल्याने ही ऑडिशन आयोजित करण्यात आली होती.
या अजगरांची ऑडीशन सर्पमित्र जो आइकफेल्ड यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली. या ऑडिशनसाठी तीन अजगर आणण्यात आले होते. यामध्ये पहिला अजगर आकाराने लहान असल्याने तो बसला नाही. दुसरा अजगर आकाराने योग्य असूनही रंगमंचावरील आवश्यक हालचालींच्या निकषांवर तो मागे पडला. तिसरा प्रिन्सेस नावाचा सुमारे २२ किलोहून वजनाची 'प्रिन्सेस' नावाची अजगर सध्या या भूमिकेसाठी आघाडीवर आहे.
अजगर काय करणार
या ऑपेरामध्ये कलाकाराला थेट अजगराला हाताळावे लागणार आहे. भूमिकेविषयी बोलताना संबंधित कलाकाराने सांगितले, "सादरीकरणादरम्यान मला या अजगराला डोक्यावर उचलावे लागणार आहे. त्याचे वजन बरेच असल्याने हे करताना माझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि हालचालींमध्ये सहजता दिसणे गरजेचे आहे. म्हणूनच अजगराचा स्वभाव शांत आणि जुळवून घेणारा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे."
अजगराची अंतिम निवड अद्याप झालेली नसून जो आइकफेल्ड आणखी काही अजगरांची चाचणी घेत आहेत. ही बहुचर्चित ऑपेरा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, रंगमंचावर कलाकारासोबत अजगर पाहण्यासाठी नाट्यप्रेमी उत्सुक आहेत.