पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत हडसन नदीत एका बेल २०६एल-४ लॉन्गरेंजर ४ हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मृतांमध्ये एक पायलट आणि तीन लहान मुलांसह स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. या हेलिकॉप्टरने लोअर मॅनहॅटनहून उड्डाण केले होते. ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या दिशेने जात होते. यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजकडे वळून ते न्यू जर्सीजवळ नदीत कोसळले. या दुर्घटनेची माहिती न्यूयॉर्क शहराच्या महापौरांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी परिसरात ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाच्या माहितीनुसार, अपघातावेळी वाऱ्याचा वेग १० ते २५ मैल प्रतितास दरम्यान होता. दृश्यमानता चांगली होती, मात्र हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. या दुर्घटनानंतर न्यूयॉर्क पोलिस विभागाने (NYPD) नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सांगितले की, वेस्ट साइड हायवे आणि स्प्रिंग स्ट्रीट परिसरात आपत्कालीन वाहनांची वर्दळ आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) ने या दुर्घटनेची अधिकृत माहिती दिली असून, तपासासाठी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB) सोबत संयुक्तरीत्या काम सुरू असल्याचेही स्पष्ट केले आहे.