अमेरिकेत परदेशी नागरिकांना 'ही' कागदपत्रे २४ तास सोबत ठेवावी लागणार, नाहीतर थेट तुरुंगात! 
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत परदेशी नागरिकांना 'ही' कागदपत्रे २४ तास सोबत ठेवावी लागणार, नाहीतर थेट तुरुंगात!

US immigration rule 2025 | ट्रम्प प्रशासनाचा नवा आदेश

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने एक नवीन नियम लागू केला आहे, ज्यानुसार आता प्रत्येक परदेशी नागरिकाला आपली ओळख पटवणारी कागदपत्रे २४ तास जवळ ठेवावी लागणार आहेत. हा नियम ११ एप्रिलपासून अंमलात आला असून त्याचा उद्देश बेकायदेशीर स्थलांतरांवर नियंत्रण ठेवणे आणि अनधिकृतपणे अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना देशाबाहेर काढणे हा आहे.

व्हाईट हाऊसने जाहीर केले की, अमेरिकेत ३० दिवसांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना सरकारकडे नोंदणी करावी लागेल. जर नोंदणी केली नाही तर दंड, तुरुंगवास आणि हद्दपारीची शिक्षा होईल. या घोषणेमुळे अमेरिकेतील स्थलांतरित समुदायांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, "३० दिवसांपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना संघीय सरकारकडे नोंदणी करावी लागेल. त्याचे पालन न केल्यास अटक करून दंड आकारला जाईल. शिवाय हद्दपार केल्याने पुन्हा कधीही अमेरिकेत येऊ शकणार नाही."

काय आहे नवीन नियम?

  • नोंदणी अनिवार्य :

३० दिवसांपेक्षा जास्त अमेरिकेत राहणाऱ्या सर्व १४ वर्षांवरील परदेशी नागरिकांना “Form G-325R” भरून सरकारकडे नोंदणी करावी लागणार आहे. तसेच १४ वर्षांखालील मुलांसाठी त्यांच्या पालकांना नोंदणी करावी लागेल.

  • कागदपत्रे बाळगणे बंधनकारक :

कोणत्याही परदेशी नागरिकाने त्यांचा व्हिसा, ग्रीन कार्ड वा ओळख कागदपत्रे कायम स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्यास $5,000 पर्यंत दंड, ६ महिन्यांपर्यंत कारावास, किंवा देशातून हकालपट्टी होऊ शकते.

  • पत्ता बदलल्यास माहिती देणे आवश्यक:

पत्ता बदलल्यानंतर १० दिवसांच्या आत सरकारला कळवावे लागेल.

  • पुन्हा नोंदणी:

१४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलांना ३० दिवसांत पुन्हा नोंदणी करावी लागेल व हाताचे ठसे द्यावे लागतील.

कोणत्या नागरिकांवर होईल प्रभाव?

अवैध स्थलांतरित :

  • ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे नाहीत, त्यांना नोंदणी करणे आणि कागदपत्रे जवळ ठेवणे बंधनकारक आहे.

वैध स्थलांतरित :

  • ज्यांच्याकडे वैध H-1B व्हिसा, स्टुडन्ट व्हिसा किंवा ग्रीन कार्ड आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करायची गरज नाही, परंतु कागदपत्रे कायम बाळगणे गरजेचे आहे.

भारतीय नागरिक :

  • सुमारे ५.४ मिलियन भारतीय अमेरिकेत आहेत, त्यातील २.२ लाख बेकायदेशीर स्थलांतरित आहेत.

  • H-1B व्हिसा असलेले किंवा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी असलेल्यांना नोंदणीपासून सूट आहे, परंतु त्यांना देखील ओळखपत्रे जवळ ठेवावी लागतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT