Netherlands Gold | नेदरलँड्सने ८६ टन सोने लंडनला हलवले 
आंतरराष्ट्रीय

Netherlands Gold | नेदरलँड्सने ८६ टन सोने लंडनला हलवले

अमेरिका, कॅनडात ठेवलेला साठा केला कमी; संकटकाळासाठी निर्णय

पुढारी वृत्तसेवा

ॲमस्टरडॅम; वृत्तसंस्था : वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर नेदरलँड्सने अमेरिका आणि कॅनडामध्ये ठेवलेले तब्बल ८६ टन सोने लंडनला हलवले आहे. डच सेंट्रल बँक अर्थात डीएनबीने मार्च ते ऑगस्टदरम्यान टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पूर्ण केली. आता हे सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवण्यात आले आहे. संकटकाळात लंडनमधील सोन्याचा साठा अधिक सहजपणे खरेदीविक्री करता येतो, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे डीएनबीने स्पष्ट केले आहे.

५० टक्केपैकी १८.५ टक्के साठा शिल्लक

या हस्तांतरणापूर्वी नेदरलँड्सच्या एकूण सोन्यापैकी ३१.३ टक्के सोने न्यूयॉर्कमध्ये, तर १९.७ टक्के ओटावामध्ये ठेवले होते. हस्तांतरणानंतर या दोन्ही ठिकाणचा हिस्सा १८.५ टक्क्यांवर आला आहे. त्याचवेळी लंडनमधील सोन्याचा हिस्सा १८.१ टक्क्यांवरून वाढून ३२.१ टक्के झाला आहे. नेदरलँड्समध्येच सुमारे ३०.८ टक्के सोने ठेवण्यात आले आहे.

संकटकाळात सोने ठरणार उपयुक्त

लंडनमध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. त्यामुळे आर्थिक संकटाच्या काळात येथे ठेवलेले सोने तुलनेने लवकर विकून निधी उभारता येतो. गरज भासल्यास या सोन्याचा वापर इतर बँकिंग संस्थांकडून निधी उभारण्यासाठी किंवा सोन्याच्या व्यवहारांसाठी करू शकते.

नेदरलँड्सकडे ६१२.४ टन सोन्याचा साठा

२०२५च्या अखेरीस नेदरलँड्सकडे एकूण ६१२.४ टन सोन्याचा साठा होता. त्याची किंमत सुमारे ७२.२ अब्ज युरो, म्हणजे जवळपास ८ लाख कोटी रुपये इतकी होती. या प्रचंड सोन्याच्या साठ्याचे विविध ठिकाणी व्यवस्थापन करताना सुरक्षितता, बाजारपेठेतील उपलब्धता आणि संकटाच्या काळात त्वरित वापरता येण्याची क्षमता यांचा विचार केला जात आहे.

२७ टन सोने नेदरलँड्समध्ये आणले

डीएनबीच्या माहितीनुसार, या प्रक्रियेत २७ टन सोन्याच्या लगडी न्यूयॉर्क आणि ओटावामधून नेदरलँड्समधील जाइस्ट येथे आणले. त्यानंतर हे सोने लंडनला पाठवले गेले. मात्र, अटलांटिक महासागर ओलांडून एवढ्या सोन्याची वाहतूक कशी केली, याची माहिती डीएनबीने दिलेली नाही. न्यूयॉर्कमध्ये ठेवलेले उर्वरित ५९ टन सोने विकण्यात आले आणि त्याच्या समतुल्य प्रमाणातील सोने लंडनमध्ये खरेदी करण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष ५९ टन सोने अमेरिकेतून लंडनला वाहून नेण्याची गरज पडली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT