तेल अवीव; वृत्तसंस्था : इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याच आघाडीतील युनायटेड टोरा ज्यूडिझम या पक्षाने विरोधी पक्षनेते गादी आयसेनकोट यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याची चर्चा आहे. पक्षाने आयसेनकोट यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी हरदी ज्यू समुदायाला अनिवार्य लष्करी सेवेतून सूट देण्याची अट घातल्याचे वृत्त आहे.
सरकारविरोधातील महत्त्वाच्या मतदानावेळी विरोधात मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका पक्ष घेऊ शकतो. त्यामुळे आयसेनकोट यांना सरकार चालवण्यासाठी आवश्यक राजकीय पाठबळ मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. विशेष म्हणजे, युनायटेड टोरा ज्यूडिझम हा आतापर्यंत नेतान्याहू यांचा सहकारी पक्ष होता. मात्र, आता नेतान्याहू यांच्यासोबत राहून काही साध्य होणार नसल्याचे पक्षाच्या एका नेत्याने म्हटल्याचे वृत्त आहे. निवडणुकीनंतर नेतान्याहूविरोधी पक्षांकडे एकत्रित ६७ जागा असल्याचा दावा विरोधी नेते यायर लॅपिड यांनी केला आहे. तर नेतान्याहू यांच्या आघाडीकडे ५३ जागा आहेत.
इस्रायलमध्ये बहुतांश ज्यू नागरिकांसाठी लष्करी सेवा अनिवार्य आहे. मात्र, हरदी या अतिधार्मिक ज्यू समुदायात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दीर्घकाळापासून लष्करी सेवेतून प्रमाणावर सूट दिली जाते. नेतान्याहू हे हरदी समुदायाला लष्करी सेवेतून सूट देण्याच्या बाजूने आहेत. आयसेनकोट यांची मात्र हरदी समुदायातील तरुणांनाही लष्करी किंवा नागरी सेवेत सहभागी करावे, अशी भूमिका आहे. त्यामुळे ही अट स्वीकारणे आयसेनकोट यांच्यासाठी आव्हान ठरू शकते.