तेल अवीव; वृत्तसंस्था : इस्रायलच्या निवडणुकीत कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी विरोधी पक्षनेते गादी आयझेनकोट यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची शक्यता नाकारलेली नाही. अरब पक्षांच्या पाठिंब्यामुळे आयझेनकोट पर्यायी सरकार स्थापन करू शकतात आणि आपली सत्ता जाऊ शकते, अशी चिंता नेतान्याहू यांना असल्याचे इस्रायली माध्यमांनी म्हटले आहे.
नेतान्याहू समर्थक आघाडीला ५३, आयझेनकोट यांच्या विरोधी आघाडीला ४८, तर अरब पक्षांना १९ जागा मिळाल्या आहेत. नेतान्याहू यांच्यासमोर तीन पर्याय आहेत. विरोधी आघाडीतील काही पक्ष किंवा खासदारांना आपल्या बाजूने वळवणे, आयझेनकोट यांच्यासोबत राष्ट्रीय एकता सरकार स्थापन करणे किंवा बाहेरून पाठिंबा घेऊन अल्पमतातील सरकार चालवणे. मात्र, विरोधकांनी निवडणुकीत नेतान्याहू यांना सत्तेतून हटवण्याचे आश्वासन दिले असल्याने त्यांच्यासोबत सरकार स्थापन करणे राजकीयदृष्ट्या कठीण ठरू शकते.
दुसरीकडे, आयझेनकोट यांच्यासमोर अरब पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा पर्याय आहे. मात्र, इस्रायलच्या राजकारणात अरब पक्षांच्या सहभागाला विरोध असल्याने त्यांच्या आघाडीत मतभेद होण्याची शक्यता आहे. कट्टरपंथी ज्यू धार्मिक पक्षांना सोबत घेण्याचाही त्यांचा प्रयत्न असू शकतो. मात्र, लष्करातील अनिवार्य भरतीच्या मुद्द्यावर या पक्षांमध्ये मतभेद आहेत. आयझेनकोट यांनी नेतान्याहू यांच्या प्रस्तावावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.