वॉशिंग्टन डी. सी. अनिल टाकळकर
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यासाठी इराणबरोबर पुन्हा संघर्ष सुरू होणे अल्पकालीन दृष्टीने लाभदायक ठरले असून त्यांची ही राजकीय अपरिहार्यता असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र इराणने इस्रायलवर केलेले क्षेपणास्त्र हल्ले दीर्घकालीनदृष्ट्या इस्रायलसाठी प्रतिकूल संकेत देत असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर नेत्यान्याहू झुकण्यास तयार नाहीत. वेळ पडल्यास त्यांच्याशी संघर्ष करण्यास ते तयार आहेत, यातून ते आपल्या समर्थकांना दाखविण्याचा प्रयत्न करू शकतात. ट्रम्प यांनी रविवारी बेरूतच्या उपनगरांवर बॉम्बहल्ला केल्याबद्दल इस्रायलला म्हणजेच नेत्यान्याहू यांना फटकारले होते. त्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर इस्रायलने संयम बाळगावा, असा युक्तिवादही केला होता. ट्रम्प यांना विरोध करणे किंवा किमान तसे दाखविणे हे नेत्यान्याहू यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते.
पुनर्निवडणूक लढतीच्या पार्श्वभूमीवर जनमत चाचण्यांमध्ये ते मागे पडले आहेत. अवघ्या एका आठवड्यापूर्वी ट्रम्प यांनी संतप्त आणि शिवीगाळयुक्त दूरध्वनी संभाषणात त्यांचा अपमान केला होता. नंतर ट्रम्प यांनी स्वतः नेत्यान्याहूंना वेडे (क्रेझी) असे संबोधले होते. त्याची पुष्टीही केली होती.
शांतता करार इस्रायलसाठी घातक
ट्रम्प प्रशासन इराणबरोबर ज्या शांतता कराराचा पाठपुरावा करत आहे, तो इस्रायलसाठी घातक ठरेल, अशीही नेत्यान्याहू यांची भीती आहे, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. लेबनॉनमध्ये प्रभावी असलेल्या दहशतवादी संघटना हिजबुल्लाहविरुद्ध कारवाईचे इस्रायलचे हात बांधले जाऊ शकतात. इराणबरोबरच्या युद्धात परस्पर देशांवर हवाई हल्ले झाले तर पुन्हा त्याचे परिणाम सर्वकष युद्धात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या परिस्थितीत त्यामुळे कोणताही व्यापक शांतता करार साध्य करणे अधिक कठीण होऊ शकते. काही इस्रायली विश्लेषकांचे असे म्हणणे आहे की, इस्रायलच्या हल्ल्याने त्या चर्चामध्ये इराणकडून अधिक अनुकूल अटी मिळवून देण्यास मदत करू शकतात. कारण त्यामुळे इराणला नव्याने झळा सहन कराव्या लागतील.
सर्व काही इराणी नेत्यांवर अवलंबून
आता सर्व काही इराणी नेते काय करतात यावर अवलंबून आहे, असे इस्रायलचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झ्याल हुलाटा यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, इराणची बढाईखोर भूमिका ही त्यांना झालेल्या गंभीर नुकसानीचे वास्तव झाकण्याचा प्रयत्न आहे. ते मजबूत दिसतात, पण याचा अर्थ ते खरोखरच मजबूत आहेत असे नाही, असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी इस्रायलला संघर्ष अधिक तीव्र करण्याची परवानगी दिली, तर इराण आपल्या प्रत्युत्तराचा वेग वाढवेल, असा त्यांचा अंदाज आहे.
इस्रायलसाठी प्रतिकूल संकेत
काहींच्या मते, रविवारी इराणने इस्रायलवर केलेले क्षेपणास्त्र हल्ले दीर्घकालीन दृष्टीने इस्रायलसाठी प्रतिकूल संकेत देतात. इस्रायलला प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय दिसत नाही. परंतु त्यामुळे त्यांचा ट्रम्प यांच्याशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. येथे कोणताही चांगला पर्याय नाही, असे इराणविषयक तज्ज्ञ आणि इस्रायली लष्करी गुप्तचर विभागाचे निवृत्त अधिकारी डॅनी सिट्रोनोव्हिक्झ यांनी सांगितले.