नेपाळमधील के. पी. शर्मा ओली सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. ‘जनरेशन न’ने भ्रष्टाचारासाठी जबाबदारी निश्चित करण्याची आणि 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदीची मागणी केली. आंदोलकांनी नेत्यांच्या घरांवर हल्ले केले आणि काठमांडूतील बानेश्वर येथील संसद भवनात घुसून इमारतीला आग लावली. निदर्शकांच्या आंदोलनादरम्यान नेपाळमध्ये 18 तुरुंग फोडले असून 6 हजार कैदी फरार झाले आहेत. या मोठ्या जेलब्रेकच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने बिहारच्या नेपाळ सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे.
गुन्हेगार सीमा ओलांडून बिहारमध्ये आश्रय घेऊ शकतात. या शक्यतेमुळे सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये दक्षता वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सशस्त्र सीमा बल आणि पोलीस दलाची तैनाती वाढवण्यात आली असून, ड्रोन कॅमेर्यांद्वारे पाळत ठेवली जात आहे. गृहमंत्रालयाच्या या अहवालानंतर नेपाळ सीमेवर तैनात असलेल्या एसएसबी जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे.
माजी पंतप्रधानाच्या पत्नीला जिवंत जाळले व अर्थमंत्र्यांना पाठलाग करून बदडले आहे. हिंसक निदर्शनांमुळे नेपाळमधील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या घराला आग लावण्यात आली. त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकर या यामध्ये गंभीर भाजल्या. त्यांना तातडीने कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांना त्यांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली, तर अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना काठमांडूमधील त्यांच्या घराजवळ पळवून-पळवून मारण्यात आले.