काठमांडू; वृत्तसंस्था : नेपाळमध्ये गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या विनाशकारी पूरस्थितीने भीषण रूप धारण केले असून आतापर्यंत ११२७ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर ४,८०० हून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी बुधवारी संसदेला संबोधित करत पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदतकार्यासाठी भारत व चीनने वेळेवर दिलेल्या सहकार्याबद्दल दोन्ही शेजारी देशांचे आभार मानले.
पंतप्रधान शाह म्हणाले की, भारत आणि चीनकडून वेळेवर मदतसामग्री, तांत्रिक पथके आणि आपत्कालीन सहाय्य पाठविण्यात आली. भारताने नेपाळसाठी आतापर्यंत मदतीची पाचवी खेप पाठविली असून भारतीय तज्ज्ञ पथके बोगद्यांमधील शोधमोहीम तसेच मृतदेहांची ओळख पटविण्याच्या कामात मदत करत आहेत. आतापर्यंत ९५ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अनेक मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसल्याने प्रशासनाने काही ठिकाणी त्यांचे दहन करण्याऐवजी दफन करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून भविष्यात डीएनए तपासणीद्वारे त्यांची ओळख पटविता येईल.
चीनने ग्यिरोंग सीमेकडे जाणारा महामार्ग खुला केल्याने मदत आणि बचाव पथकांना बाधित भागांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. त्यामुळे दुर्गम भागांमध्ये मदत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात गती मिळाली आहे. मृतदेहांची ओळख पटविणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान बनले आहे. पाणी आणि चिखलात अनेक दिवस अडकून राहिल्याने अनेक मृतदेहांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए तपासणीची मदत घेतली जात आहे. भारतीय तज्ज्ञांचे पथकही या कामात सहभागी झाले आहे.
जलविद्युत प्रकल्पांमधील कर्मचारी बेपत्ता
पूरग्रस्त भागांतील परिस्थिती अद्याप गंभीर असून अनेक जलविद्युत प्रकल्पांमधील कर्मचारी बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. काही नागरिक अद्याप बोगद्यांमध्ये अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके काम करत आहेत. अमेरिकेच्या क्रायसिस रिस्पॉन्स इंटरनॅशनल या संस्थेचे १३ सदस्यीय बचाव पथकही नेपाळमध्ये दाखल झाले.
नद्यांची पातळी धोक्याच्या वर
दरम्यान, सततचा पाऊस आणि पूरस्थितीमुळे नेपाळमधील सुनकोशी, बुढी गंडकी आणि महाकाली या प्रमुख नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेली आहे.
पाच वर्षांच्या मुलाला जिवंत बाहेर काढले
भीषण संकटात काही आशादायी घटनाही घडल्या आहेत. पुराच्या ढिगाऱ्याखाली चार दिवस अडकून राहिलेल्या पाच वर्षांच्या मुलाला जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.