आंतरराष्ट्रीय

माउंट एव्हरेस्टची उंची पुन्हा मोजणार; भूकंपामुळे उंची घटली?

Pudhari News

काठमांडू (नेपाळ) : पुढारी ऑनलाईन

नेपाळमध्ये २०१५ मध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपानंतर जगातील सर्वात उंच शिखऱ असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची घटली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या शिखराची उंची पुन्हा मोजण्यासाठी नेपाळ सरकारने गिर्यारोहकांचे एक पथक नियुक्त केले आहे. चारजणांचा समावेश असलेले हे पथक येत्या बुधवारी माउंट एव्हरेस्टकडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

माउंट एव्हरेस्ट शिखर हिमालय क्षेत्रात नेपाळ आणि चीन सीमेवर आहे. त्यांची अधिकृत उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) एवढी आहे. भारतीय सर्वेक्षण विभागाने पहिल्यांदा १९५४ मध्ये या शिखराची उंची मोजली होती. अनेकांनी या शिखराची उंची मोजली. मात्र, १९५४ मध्ये मोजलेली उंची अधिकृतपणे स्वीकारण्यात आली.

नेपाळमध्ये २०१५ मध्ये झालेल्या भूकंपामुळे माउंट एव्हरेस्टची उंची घटली असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याची आता शहानिशा केली जात आहे. माउंट एव्हरेस्ट उंची मोजण्यासाठी पथक नियुक्त करण्यास नेपाळ सरकारने २०१७ मध्ये मंजुरी दिली होती. आता माउंट एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी पथक पाठविण्यात येत आहे. 

एडमंड हिलरी आणि तेनझिंग यांनी पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर केले त्यानंतर आजपर्यंत तिथे अनेक मोहिमा झालेल्या आहेत. आतापर्यंत ४,८०० गिर्यारोहकांनी हे जगातील सर्वोच्च शिखर सर केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT