काठमांडू : नेपाळच्या केंद्रीय बँकेने गुरुवारी 100 रुपयांच्या नवीन चलनी नोटांचे अनावरण केले. या नोटांवर एक सुधारित राष्ट्रीय नकाशा छापण्यात आला आहे. ज्यात विवादित कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या प्रदेशांचा समावेश आहे. हे प्रदेश आपलेच असल्याचे भारताने नेहमीच म्हटले आहे.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. यापूर्वी नवी दिल्लीने नेपाळच्या 2020 मधील नकाशा बदलाला ‘एकतर्फी कृत्य’ संबोधून त्याचा निषेध केला होता आणि दाव्यांचा असा ‘कृत्रिम विस्तार’ अस्वीकार्य आहे, असा इशारा दिला होता. लिपुलेख पास हा कालापानीजवळच्या अति-पश्चिम प्रदेशात आहे. या भागावर दोन्ही देश आपला हक्क सांगतात. भारत कालापानीला उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्याचा भाग मानतो, तर नेपाळचा दावा आहे की, तो धार्चुला जिल्ह्याचा भाग आहे.
नेपाळ राष्ट्र बँकेने जारी केलेल्या 100 रुपयांच्या नव्या नोटेवर माजी गव्हर्नर महाप्रसाद अधिकारी यांची सही आहे आणि नोट जारी करण्याचे वर्ष 2081 बीएस (2024) असे नमूद केले आहे. या नव्या डिझाईनच्या चलनात के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्वीकारलेल्या अद्ययावत राष्ट्रीय नकाशाचा समावेश आहे. मे 2020 मध्ये त्यांच्या सरकारने कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा यांचा नकाशात समावेश करण्यासाठी संसदीय मंजुरी मिळवली होती.