US tariffs on India
वॉशिंग्टन: व्हाईट हाऊसचे माजी व्यापार सल्लागार आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय पीटर नॅव्हारो यांनी युक्रेन युद्धातील भारताच्या भूमिकेवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. भारत रशियन तेलाच्या रिफायनरीतून प्रचंड नफा कमावत असून, भारत क्रेमलिनसाठी (रशियन सरकार) एक 'लॉन्ड्रोमॅट' बनला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
"भारताला रशियन तेलाची गरज आहे, हे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे," असे नॅव्हारो यांनी बोलताना सांगितले. मॉस्कोकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावरील आयात शुल्क दुप्पट करण्याच्या निर्णयाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २७ ऑगस्टची मुदत वाढवण्याची शक्यता नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
भारतावरील ५०% आयात शुल्कासाठी मुदतवाढ नाही
नॅव्हारो म्हणाले, "आतापासून फक्त सहा दिवसांनी म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी, भारतावर दुय्यम आयात शुल्क लादले जाईल, असे मला स्पष्ट दिसत आहे. या रक्तपातातील आपली भूमिका मान्य करण्यास भारत तयार नाही. तो शी जिनपिंग यांच्याशी जवळीक साधत आहे."
ट्रम्प यांचे दीर्घकाळचे सहकारी असलेल्या नॅव्हारो यांनी आरोप केला की, भारतीय रिफायनरी कंपन्या युक्रेन युद्धाला खतपाणी घालून स्वतःचा खिसा भरत आहेत. ते म्हणाले, "भारताला तेलाची गरज नाही - ही तर रिफायनिंगमधून नफा कमावण्याची एक योजना आहे." त्यांनी पुढे स्पष्ट केले, "भारत आम्हाला वस्तू विकून जो पैसा मिळवतो, त्याचा वापर रशियन तेल खरेदी करण्यासाठी करतो. या तेलावर रिफायनरीमध्ये प्रक्रिया करून मोठा नफा कमावला जातो. मात्र, रशिया याच पैशाचा वापर अधिक शस्त्रे बनवण्यासाठी आणि युक्रेनियन नागरिकांना मारण्यासाठी करतो. त्यामुळे अमेरिकन करदात्यांना युक्रेनला अधिक लष्करी मदत द्यावी लागते. हे पूर्णपणे वेडेपणाचे आहे."
नॅव्हारो यांनी भारताच्या नेतृत्वाची प्रशंसा करतानाच नवी दिल्लीला आपला मार्ग बदलण्याचा आग्रह धरला. "माझे भारतावर प्रेम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान नेते आहेत. पण, कृपया भारताने जागतिक अर्थव्यवस्थेतील आपली भूमिका पाहावी. तुम्ही सध्या जे करत आहात, ते शांतता निर्माण करणारे नाही, तर युद्धाला खतपाणी घालणारे आहे. आम्ही भारतावर २५% शुल्क लावत आहोत कारण ते व्यापारात आमची फसवणूक करतात आणि आणखी २५% शुल्क रशियन तेलामुळे. याचा अमेरिकन नागरिकांवर काय परिणाम होतो, हे मी तुम्हाला विचारतो?" असे नॅव्हारो म्हणाले.