NASA Study Microbes on Moon : मानवी मोहिमांद्वारे चंद्रावर परतणारे अंतराळवीर केवळ त्यांची उपकरणे आणि 'स्पेससूट'च नाही, तर सोबत सूक्ष्मजीवही घेऊन जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ('नासा') च्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पृथ्वीवरील काही जिवाणू आणि बुरशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील सुरक्षित भागांमध्ये जिवंत राहू शकतात. 'सायन्स ॲडव्हान्सेस' या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
'नासा'च्या माहितीनुसार, मानवी शरीरावर नैसर्गिकरीत्या सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव अंतराळ मोहिमांदरम्यान अंतराळवीरांच्या सूटमधून किंवा त्यांच्या वस्तीच्या ठिकाणांवरून बाहेर पडू शकतात. याचा अर्थ अंतराळवीर नकळतपणे हे सूक्ष्मजीव चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचवू शकतात.
सुप्त किंवा मृत सूक्ष्मजीव देखील शास्त्रज्ञांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरू शकतात. लँडिंगच्या ठिकाणांच्या आसपास सूक्ष्म जैविक पदार्थ तसेच राहिले, तर त्यामुळे चंद्रावरील मूळ आणि अदूषित मातीचे नमुने दूषित होऊ शकतात. यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांना चंद्राच्या नैसर्गिक व अदूषित रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करणे किंवा प्राचीन सेंद्रिय संयुगांचा शोध घेणे अत्यंत कठीण होते. यामागील मुख्य चिंता चंद्राचे दूषितीकरण ही आहे. मानवाच्या पाऊल ठेवण्यापूर्वी चंद्रावर नेमके काय अस्तित्व होते, हे जाणून घेण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. पृथ्वीवरील सूक्ष्मजीव तेथे जिवंत राहिले, तर चंद्रावर मूळचे काय होते आणि अंतराळवीरांनी काय आणले, याचा फरक ओळखणे कठीण होईल. 'नासा'च्या मते, अशा प्रकारचे दूषितीकरण समजून घेतल्यास भविष्यात मंगळावर जीवनाचा शोध घेणाऱ्या मोहिमांची तयारी करण्यास मदत होईल.
अतिनील किरणोत्सर्ग आणि टोकाचे तापमान यामुळे चंद्राचा बहुतांश भाग सूक्ष्मजीवांसाठी अत्यंत प्रतिकूल आहे. परंतु, संशोधकांना असे आढळून आले की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील सावली असलेले क्षेत्र या सूक्ष्मजीवांना काही प्रमाणात संरक्षण देऊ शकते. यात मोठ्या विव्हरांच्या (क्रेटर) तळापासून ते अगदी अंतराळवीरांच्या बुटांच्या ठशांएवढ्या लहान भागांचा समावेश असू शकतो.
दरम्यान, जिवंत राहणे म्हणजे चंद्रावर सूक्ष्मजीवांची वाढ होणे असा नाही. चंद्रावर या सजीवांची वाढ होण्यासाठी किंवा पुनरुत्पादन होण्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती उपलब्ध असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे 'नासा'ने स्पष्ट केले आहे. हे सूक्ष्मजीव तिथे केवळ सुप्तावस्थेत जिवंत राहू शकतात.