आंतरराष्ट्रीय

NASA Artemis-II Mission Moon : तब्बल पन्नास वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राच्या दारी!, अंतराळवीर खाणार काय? झोपणार कसे?

NASA Mission Moon : मोहिमेचा खर्च 7.7 लाख कोटी रुपये, ‘अपोलो’नंतर सर्वात मोठा प्रवास

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : तब्बल पन्नास वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राच्या दारी जाण्यासाठी रवाना झाला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास ‌‘नासा‌’चे चार अंतराळवीर चंद्र मोहिमेसाठी झेपावले आहेत. ‌‘नासा‌’च्या ‌‘आर्टेमिस-2‌’ अभियानाद्वारे चार अंतराळवीर चंद्राभोवती एक प्रदक्षिणा घालतील आणि सुमारे दहा दिवसांनी पृथ्वीवर परततील.

‌‘आर्टेमिस-2‌’ मिशनद्वारे अमेरिकेचे अंतराळवीर रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर आणि क्रिस्टीना कोच, तसेच कॅनडाचे जेरेमी हॅन्सेन हे अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालतील. मात्र, ते चंद्रावर उतरणार नाहीत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जवळपास एक वर्ष घालवलेल्या 47 वर्षीय कोच या चंद्राच्या परिसरात पोहोचणाऱ्या पहिल्याच महिला अंतराळवीर ठरणार आहेत. ‌‘अपोलो मिशन‌’च्या सहा मोहिमांमध्ये 24 अंतराळवीर चंद्राजवळ पोहोचले होते. यापैकी 12 जण चंद्रावर उतरले आणि 12 जण चंद्राच्या कक्षेत राहिले होते. यातील सर्व अंतराळवीर पुरुष होते.

मोहिमेचा खर्च 7.7 लाख कोटी रुपये

7.7 लाख कोटी रुपयांच्या या मोहिमेचा मुख्य उद्देश चंद्रावर उतरणे नसून, भविष्यात चंद्रावर तळ उभारण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि प्रणालींची चाचणी घेणे हा आहे. तसेच, चंद्राच्या अंधाऱ्या बाजूवरून ‌‘लुनार फ्लायबाय‌’ पूर्ण करणे हे या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ‌‘अपोलो‌’ मोहिमेनंतर 50 वर्षे कोणत्याही मानवाने पृथ्वीपासून इतका मोठा प्रवास केला नव्हता.

1960 आणि 1970 च्या दशकात सहा वेगवेगळ्या मोहिमांमध्ये 12 मानवांना ‌‘अपोलो‌’ मोहिमेंतर्गत चंद्रावर उतरविण्यात आले होते. यानंतर आजवर शेकडो अंतराळवीरांनी अंतराळात प्रवास केला. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही अंतराळ स्थानकाच्या पुढे जाण्याचे धाडस केले नव्हते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून सुमारे 400 कि.मी. उंचीवर कार्यरत आहे.

अंतराळवीर खाणार काय? झोपणार कसे?

या मोहिमेत अंतराळवीर फ्रिज ड्राईड म्हणजेच अंशत: सुक्या पदार्थांवर अवलंबून असतील, ज्यामध्ये पाणी मिसळून त्यांना ते खाता येतील. जेवण गरम करण्यासाठी त्यांना लहानसा फूड वॉर्मर देण्यात आला आहे. तसेच, अंतराळवीरांना झोपण्यासाठी झुल्यासारख्या स्लिपिंग बॅग देण्यात आल्या आहेत. अंतराळवीरांसाठी स्पेस टॉयलेटची व्यवस्था असून, तिथे व्हॅक्यूम प्रणालीचा वापर करून मलमूत्रावर विविध प्रक्रिया केल्या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT