दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी युक्रेनमध्ये आगमन झाले. file photo
आंतरराष्ट्रीय

मोदींचा युक्रेन दौरा, झेलेन्स्की यांची भेट; जाणून घ्या चर्चेतील ५ ठळक मुद्दे

PM Modi Ukraine Visit | रशिया-युक्रेन संघर्षात भारत त्रयस्थ नाही

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी युक्रेनमध्ये आगमन झाले. पोलंडमधून रेल्वेने ७ तास प्रवास केल्यानंतर मोदी युक्रेनमध्ये पोहोचले. युक्रेनला भेट देणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मोदी यांचे औपचारिक स्वागत केले. रशियाच्या हल्ल्यात बळी पडलेल्या मुलांच्या स्मारकास भेट देऊन मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. यानंतर उभय नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. मोदी यांच्या या ऐतिहासिक भेटीमध्ये रशिया-युक्रेनमधील शांतता प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. जाणून घ्या चर्चेतील ठळक मुद्दे...

रशिया-युक्रेन संघर्षात भारत त्रयस्थ नाही

रशिया-युक्रेन संघर्षात भारताने कधीही त्रयस्थ भूमिका घेतली नाही. उलट आम्ही शांततेच्या पक्षाचे आहोत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना शुक्रवारी आश्वस्त केले. अडीच वर्षांहून अधिक काळ दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांची जीवित आणि वित्तहानी मोठी झाल्याचे स्पष्ट करीत मोदी यांनी भारताने कदापिही त्रयस्थ भूमिका घेतली नसल्याचे स्पष्ट केले. मानवतेसाठी आणि दोन्ही देशांच्या हितासाठी शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याची गरज असल्याचे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भारताने शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याची आग्रही भूमिका मांडली होती.

युक्रेनला वैद्यकीय मदत जाहीर

मरिन्स्की पॅलेसमध्ये मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीस दोन्ही देशांतील उच्चपदस्थही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी उभय देशांमध्ये व्यापार, तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांतील सामंजस्य करारावरही स्वाक्षरी केली. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी युक्रेनला वैद्यकीय मदत जाहीर केली. 'भीष्म क्युब' हे वैद्यकीय उपकरणही त्यांनी झेलेन्स्की यांना दिले.

रशिया-युक्रेन संघर्षावर राजनैतिकस्तरावर तोडगा

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उभय राष्ट्रप्रमुखांमधील चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या संवादाची माहितीही मोदी यांनी झेलेन्स्की यांना दिली. रशिया-युक्रेन संघर्षावर शांतता आणि राजनैतिकस्तरावर तोडगा काढण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला आहे. चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी पुढाकार घ्यायला हवा, असे मोदी यांनी झेलेन्स्की यांना सांगितल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

झेलेन्स्की यांना भारत भेटीचे निमंत्रण

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत भेटीचे निमंत्रण दिल्याची माहिती परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिली. झेलेन्स्की त्यांच्या सोयीनुसार भारत भेटीवर येतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोदींचा युक्रेन दौरा लाभदायी ठरू शकतो : अमेरिकेचे मत

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष संपविण्याच्या दृष्टीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युक्रेन भेट लाभदायी ठरू शकते, असे अमेरिकेने म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, मोदी यांच्याकडून आम्हालाही मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी स्वतःचा प्रभाव टाकून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न केले, तर ती जागतिक शांततेच्या दृष्टीने लक्षवेधी घटना असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT