लंडन : वृत्तसंस्था
भारतातील अग्रगण्य कंपनी असलेल्या 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांची ब्रिटनच्या अर्थमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. 'यूके चान्सलर ऑफ द एक्सचेकर' ही जबाबदारी त्यांना सोपविण्यात आली आहे. ब्रिटनच्या घटनेनुसार हे पद आपल्याकडील अर्थमंत्रिपदाच्या समकक्ष आहे. प्रीती पटेल यांना गृहमंत्रिपद देण्यात आले आहे. आलोक शर्मा यांची इंग्लंडचे आंतरराष्ट्रीय विकास मंत्री म्हणून निवड झाली आहे.
ज्या इंग्लंडने भारतावर दीडशे वर्षे राज्य केले, त्या इंग्लंडमध्ये एक, दोन नव्हे; तर तब्बल तीन-तीन भारतीय वंशाचे लोक राज्यकर्त्या केंद्रीय मंत्रिमंडळात अत्यंत सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हावेत, ही बाब भारताच्या द़ृष्टीने ऐतिहासिक मानली जात आहे.
डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत जॉन्सन हे बहुमताने विजयी झाल्यानंतरच्या घडामोडींचा एक भाग म्हणून पाकिस्तानी वंशाच्या साजिद जावेद यांनी अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला. लगोलग ऋषी सुनाक यांना ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 2015 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. संसदेत ऋषी यांच्या निवडीची बातमी ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आलेली आहे.