पुढारी ऑनलाईन डेस्क : म्यानमारला (Earthquake In Myanmar) शुक्रवारी (दि.28) जोरदार भूकंपाचे दोन तीव्र धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 आणि 6.4 अशी नोंद झाली. या भूकंपाचा हादरे इतके तीव्र होते की 900 किलोमीटर दूर असलेल्या थायलंडच्या बँकॉकमध्येही याचे धक्के जाणवले. लोक घाबरून घराबाहेर पडले, तसेच काही इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात 10 किलोमीटर खोलवर होता. काही अहवालांनुसार, म्यानमारमध्ये अजूनही हलक्या स्वरुपाचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या भूकंपामुळे म्यानमारच्या मांडले शहरातील प्रसिद्ध अवा ब्रिज (इरावदी नदीवरील पूल) कोसळल्याची माहिती मिळाली आहे. अनेक इमारतींना तडे गेले असून, मोठ्या प्रमाणात हानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
काही वृत्तसंस्थांनी वृत्त दिले आहे की शुक्रवारी म्यानमारमध्ये ७.२ आणि ६.४ तीव्रतेचे सलग दोन भूकंप झाले. म्यानमारमधील मंडाले येथील इरावती नदीवर बांधलेला प्रसिद्ध अवा पूल कोसळल्याचा दावा केला जात आहे. भूकंपात अनेक इमारतींचेही नुकसान झाले आहे. भूकंप इतका तीव्र होता की त्याचे धक्के सुमारे ९०० किलोमीटर अंतरावर असलेल्या बँकॉकमध्येही जाणवले.
बँकॉक पोलिसांनी सांगितले की, दुपारी थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये झालेल्या ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे निर्माणाधीन एक उंच इमारत कोसळली. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना बँकॉकच्या लोकप्रिय चतुचक मार्केटजवळ घडली. इमारत कोसळण्याच्या घटनेवळी घटनास्थळी किती कामगार होते? याची तात्काळ माहिती मिळू शकली नाही.
म्यानमारमध्ये झालेल्या दोन तीव्र भूकंपाचे धक्के भारतातील मणिपूर आणि मेघालयासह ईशान्येकडील राज्यांमध्ये जाणवले. मेघालयातील पूर्व गारो हिल्समध्ये ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाची नोंद झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. दरम्यान, म्यानमारला लागून सुमारे ३९० किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या मणिपूरमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.