आंतरराष्ट्रीय

पाकच्या पेशावरमध्ये शीख तरुणाची निर्घृण हत्या

Pudhari News

पेशावर : वृत्तसंस्था

पाकिस्तानातील ननकानासाहिब गुरुद्वारावरील हल्ल्याला एक दिवस उलटत नाही तोच शनिवारी पेशावरमध्ये एका शीख युवकाची हत्या करण्यात आली आहे. रवींदर सिंह (25) असे या युवकाचे नाव आहे. तो खैबर पख्तुनख्वामधील शांगला जिल्ह्यातील रहिवासी होता. लग्नानिमित्तच्या खरेदीसाठी तो पेशावरमध्ये आला होता. रवींदरच्या खुनातील आरोपी फरार आहेत. पाकिस्तान सरकारने अल्पसंख्याक हिंदू, शीख समाजाच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

रवींदरचा खून करणार्‍यानेच रवींदरच्या कुटुंबीयांना फोन केला आणि रवींदरला मारून टाकल्याचे फोनवरून सांगितले. हत्येमागे वैयक्तिक कारण असले तरी अल्पसंख्याकांना मारले तरी हा पाकिस्तान आहे आणि इथे त्यामुळे काही बिघडत नाही, हा मारेकर्‍याचा मुजोरपणा भयावह असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. रवींदरचे बंधू हरमितसिंह यांनी सांगितले की, पाकिस्तानात हिंदूंची आणि शिखांची स्थिती दयनीय आहे. आरोपीला अटक करावी म्हणून इथे  आता सतत आवाज उठवावा लागणार आहे.

शीख तरुणीचे अपहरण, तिच्या मनाविरुद्ध तिचे धर्मांतर, नंतर गुरू नानकदेवजी यांच्या जन्मस्थळावर हल्ला, ननकानासाहिबच्या नामांतराची धमकी आणि लगोलग शीख युवकाची हत्या या सलग घडलेल्या घटनांनी पाकिस्तान या देशात अल्पसंख्याकांना कधीही माणूस म्हणून वागणूक मिळाली नाही, मिळत नाही आणि मिळणार नाही, यावर शिक्कामोर्तब झालेले आहे, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

 

SCROLL FOR NEXT