100 rupee ring worth 2 lakhs : ब्रिटनमधील एका महिलेने सेलमध्ये एक अंगठी खरेदी केली. आर्टिफिशयल खडे लावलेली ही अंगठी असल्याचा समज व किंमतही अगदीच नगण्य १ पौंड असल्याने ती खरेदी केली. पण ज्यावेळी या अंगठीची सत्यता समोर आली त्यावेळी महिलेच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण केवळ १ पौंड (१०० रुपये) किंमत असलेली ही अंगठी ५०० वर्षापूर्वीची मौल्यवान अंगठी निघाली व तिची किंमतही २००० हजार पौंड जवळपास २ लाख रुपये असल्याचे सिद्ध झाले. भारतातील मुघलांच्या काळात ही अंगठी तयार केली होती.
ब्रिटनमधील एका चॅरिटी शॉपमधून (धर्मादाय दुकान) एका महिलेने ही अंगठी खरेदी केली होती. ही अंगठी तिला दिसायला सुंदर वाटली आणि किंमतही अगदीच कमी होती, म्हणून तिने ती विकत घेऊन घरी आणली. परंतु, जेव्हा एका तज्ज्ञाची नजर या अंगठीवर पडली, तेव्हा या स्वस्त अंगठीचे मोठे रहस्य उलगडले. हा एक पुरातन खजिना निघाला आणि अंगठीचा प्रवास थेट जमिनीवरून थेट आकाशात असा झाला. या अंगठीची किंमत लाखोंच्या घरात ठरली आहे.
ज्या अंगठीला या महिलेने साधी आर्टिफिशियल ज्वेलरी समजले होते, ती प्रत्यक्षात अस्सल सोन्याची भारतीय अंगठी होती. या अंगठीत मौल्यवान रत्ने जडवलेली होती आणि त्यामुळेच तिची किंमत २,००० पौंड इतकी मोजली गेली. भारतीय चलनात २,००० पौंड म्हणजेच सुमारे २.२ लाख रुपये होतात.
एका कार्यक्रमात या अंगठीची तपासणी करण्यात आली. अनेकदा मौल्यवान वस्तू पिढ्यानपिढ्या कशा दडून राहतात, हे यातून समोर आले. ही महिला आपली अंगठी घेऊन या शोमध्ये सहभागी झाली होती. तपासणीदरम्यान अंगठीच्या मागील बाजूस सूर्यकिरणांची नक्षी कोरलेली असल्याचे आढळले. साधारणतः १७९० ते १८०० च्या जॉर्जियन काळात बनवलेल्या दागिन्यांवरही अशाच प्रकारच्या खुणा असायच्या. पुढे अंगठीचा धातू आणि त्यातील रत्नांची सखोल तपासणी केल्यानंतर, ही भारतीय कारागिरी असल्याचे निश्चित झाले. ही भारतात तयार केलेली २२ कॅरेट सोन्याची अंगठी आहे
सुरुवातीला या अंगठीच्या मध्यभागी असलेला खडा सामान्य मानला गेला होता, परंतु तपासणीत तो अस्सल हिरा असल्याचे स्पष्ट झाले. तर, त्याच्या आजूबाजूला जडवलेले खडे माणिक असल्याचे आढळून आले. ही सर्व तपासणी 'थर्मल-टेस्टिंग' पद्धतीने करण्यात आली. या तपासणीनंतर ही अंगठी मुघलकालीन असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.