दुबई : पुढारी ऑनलाईन
1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकर याच्याह अन्य एका आरोपीला दुबईत अटक करण्यात आली आहे. अबू बकरची अटक हे भारतीय तपास यंत्रणेचे मोठे यश आहे.
तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अबू बकर हा दुबईत रहात आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली आहे. अबू बकरचे पूर्ण नाव अबू बकर अब्दुल गफूर शेख असे आहे. तो मोहम्मद आणि मुस्तफा डोसासोबत तस्करीमध्ये सहभागी होता. अबू बकर याने सोने, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आखाती देशांमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी केली होती. तसेच मुंबईत आरडीएक्स आणण्यामध्ये आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या दुबईतील घरात शिजलेल्या बॉम्बस्फोटाच्या कटामध्ये अबू सहभागी होता. त्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेतले होते.
१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत बॉम्बस्फोट झाला होता. त्यात २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर साडेसातशेपेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम अद्याप फरार आहे. तर अन्य एक आरोपी याकूब मेननला त्याच्या ५४ व्या वाढदिवसादिवशीच हणजे ३० जुलै २०१५ रोजी सकाळी ७ वाजता नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात फासावर लटकवण्यात आले. तसेच मुस्तफा डोसा याचा २०१७ साली मृत्यू झाला होता. अबू बकर याच्या विरोधात १९९७ साली रेड कॉर्नर नोटीस जारी झाले होते. त्यावेळीपासून तो भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता.