बैरूत; वृत्तसंस्था : युद्धाच्या मध्यात असलेल्या आणि अनेक पेचप्रसंगांचा, अराजक स्थितीचा सातत्याने सामना करत असलेल्या लेबनॉनमधून मागील तीन आठवड्यांत तब्बल चार लाखांहून अधिक मुले विस्थापित झाली आहेत, अशी धक्कादायक माहिती संयुक्त महासंघातील वरिष्ठ पदाधिकार्याने दिली.
इस्रायलने युद्धाची व्याप्ती वाढवत लेबनॉनस्थित हिजबुल्लाह गटाला लक्ष्य केल्यानंतर गाझा पट्ट्यातील हमासमध्ये यामुळे चकमकींची संख्या प्रचंड वाढली आहे. या पार्श्वभूमीवर लेबनॉनमधील 12 लाखांहून अधिक स्थानिकांना येथून विस्थापित व्हावे लागले. यातील बहुतांशजण बैरूत व उत्तरेकडील काही ठिक ाणी आश्रय घेत आहेत. युनिसेफचे व्यवस्थापकीय उपसंचालक टेड चायबन यांनी निर्वासितांचे आश्रयस्थान झालेल्या अनेक प्रशालांना भेटी दिल्यानंतर वृत्तसंस्थेशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या हे युद्ध तिसर्या आठवड्यात आहे आणि ज्या मोठ्या संख्येने त्याची लहान मुलांना झळ बसत आहे, ते चिंताजनक आहे. आताच्या घडीला लाखांहून अधिक मुले शिक्षणापासून वंचित झाली आहेत. त्यांच्या प्राथमिक शाळांना एक तरी युद्धाचा फटका बसला आहे किंवा ते निर्वासितांचे आश्रयस्थान म्हणून वापरले जात आहेत. थोडक्यात, एक पिढीच हातची गमावण्याचा धोका आ वासून उभा आहे.
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 2300 हून अधिक जणांचा बळी गेला असून यातील 75 टक्के बळी मागील महिन्यातच गेले आहेत, असे आरोग्य खात्याची आकडेवारी सांगते. मागील तीन आठवड्यांत 100 मुले मारली गेली असून 800 च्या आसपास मुले जायबंदी झाली आहेत.