AI MIT report 2025 file photo
आंतरराष्ट्रीय

तुमची नोकरी जाणार नाही? AI फक्त ३०% काम करू शकतो, उर्वरित माणसांवरच अवलंबून; MIT च्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

AI MIT report 2025: MIT च्या ताज्या रिपोर्टमध्ये उघड झाले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अजून माणसांची पूर्ण जागा घेऊ शकत नाही. कंपन्यांचे ९५ टक्के पायलट प्रोजेक्ट्स अयशस्वी ठरले आहेत.

मोहन कारंडे

AI MIT report 2025

नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या एन्ट्रीनंतर जगभरातील कंपन्यांनी या तंत्रज्ञानावर प्रचंड मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मात्र, या संदर्भात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कंपन्या AI वर मोठी गुंतवणूक करत असल्या तरी, त्यांचे तब्बल ९५ टक्के पायलट प्रोजेक्ट्स अयशस्वी ठरले आहेत किंवा अजूनही सुरुवातीच्या टप्प्यातच अडकले आहेत.

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) ने 'The GenAI Divide: State of AI in Business 2025' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, कंपन्यांनी जनरेटिव्ह AI कडून महसुलात झपाट्याने वाढ होण्याची अपेक्षा ठेवली होती, परंतु ही अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. AI मुळे कंपन्यांचा महसूल वेगाने वाढेल, असा जो अंदाज होता, तो पूर्णपणे फोल ठरला आहे. शक्तिशाली नवीन मॉडेल्स वापरूनही केवळ ५ टक्के AI पायलट प्रोग्राम्स यशस्वी झाले आहेत. कंपन्यांनी AI स्वीकारण्यात घाई केली, पण त्याचा खरा फायदा मोजक्याच कंपन्यांना झाला आहे.

AI इंटिग्रेशन का अयशस्वी होत आहे?

या मोठ्या अपयशामागे अवास्तव अपेक्षा, चुकीच्या पद्धतीने केलेले इंटिग्रेशन आणि कंपन्यांच्या विशिष्ट गरजेनुसार AI प्रणाली न स्वीकारणे ही प्रमुख कारणे असल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालानंतर, AI इंडस्ट्री म्हणजे केवळ एक 'बुडबुडा' आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून चॅट जीपीटी, क्लॉड आणि जेमिनी सारखी AI टूल्स कामाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवतील, असे सांगितले जात होते. स्वयंचलित पद्धतीने मजकूर तयार करण्यापासून ते ग्राहक सेवा चॅटबॉट्सपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात AI खर्च कमी करून उत्पादकता वाढवेल, असा अंदाज होता. मात्र, एमआयटीच्या संशोधनात लोकांच्या अपेक्षा आणि व्यवसायांना मिळालेले प्रत्यक्ष परिणाम यात मोठी तफावत असल्याचे दिसून आले आहे.

AI फक्त ३० टक्के काम करू शकणार

अहवालात असे आढळून आले आहे की, अॅडव्हान्स AI मॉडेल्स विश्वासार्हपणे केवळ ३० टक्के कार्यालयीन कामे हाताळू शकतात. उर्वरित कामासाठी माणसांचीच गरज भासणार आहे. अर्थात, वैयक्तिक पातळीवर AI टूल्सचा लोकांना नक्कीच फायदा मिळू शकतो, पण संस्थात्मक पातळीवर चित्र वेगळे आहे. एमआयटीच्या अभ्यासानुसार, एंटरप्राइज स्तरावर AI अवलंब अयशस्वी होण्याचे मुख्य कारण 'लर्निंग गॅप' आहे. कंपन्या वेगाने AI लागू करत आहेत, परंतु या साधनांना आपल्या गरजेनुसार तयार करण्यासाठी गुंतवणूक करत नाहीत. ही साधने मोठ्या लँग्वेज मॉडेल्सवर तयार केलेली आहेत, जी कोणत्याही विशिष्ट गरजेसाठी बनवलेली नाहीत. त्यामुळे कंपन्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. AI हे एक शक्तिशाली साधन असले तरी, त्याचा योग्य वापर कसा करायचा, हेच कंपन्यांना अद्याप समजलेले नाही, असे हा अहवाल स्पष्ट करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT