H-1B Visa
नवी दिल्ली : ट्रम्प प्रशासनाच्या नव्या आदेशानंतर मायक्रोसॉफ्ट, मेटा, ॲमेझॉन सह अमेरिकेत कार्यरत दिग्गज कंपन्यांनी आपल्या एच-१बी आणि एच-४ व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना २४ तासांत अमेरिकेत परतण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा अर्जांवर १ लाख डॉलर शुल्क लावण्याच्या घोषणेनंतर हे आवाहन करण्यात आले. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टने आपल्या एच-१बी आणि एच-४ व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना २१ सप्टेंबरपूर्वी अमेरिकेत परतण्याचे कडक निर्देश दिले आहेत. कंपनीने एच-४ व्हिसाधारकांना अमेरिकेतच राहण्यास सांगितलं आहे. तसेच, एच-१बी व्हिसाधारकांनी सध्या तरी अमेरिकेतच राहावे, देशाबाहेर प्रवास टाळावा, असेही कंपनीने म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या एच-१बी आदेशांमुळे विशेषतः तंत्रज्ञान कंपन्यांवर परिणाम झाला आहे, कारण या कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी आयटी कामगारांसाठी असलेल्या या व्हिसावर काम करतात. ॲमेझॉनने आपल्या एच-१बी आणि एच-४ व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना सध्या अमेरिकेतच राहण्यास सांगितले आहे. जे परदेशात गेले आहेत, त्यांना तातडीने अमेरिकेत परत येण्याचे आदेश देण्यात आले आहेच, कारण त्यानंतर अंतिम मुदत संपणार आहे.
मार्क झुकरबर्ग यांच्या मेटानेही असाच आदेश जारी केला. ट्रम्प यांच्या आदेशाची अंमलबजावणी समजेपर्यंत कर्मचाऱ्यांनी किमान १४ दिवस अमेरिकेतच राहावे, असे कंपनीने सांगितले आहे. सध्या अमेरिकेबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांनी २४ तासांच्या आत परत येण्यास सांगितले आहे.
जे.पी. मॉर्गनच्या बाह्य इमिग्रेशन कौन्सिलनेही आपल्या एच-१बी व्हिसाधारकांना अशीच विनंती केली आहे. जोपर्यंत ट्रम्प प्रशासनाकडून पुढील मार्गदर्शक सूचना जारी होत नाहीत, तोपर्यंत जे.पी. मॉर्गनने आपल्या कर्मचाऱ्यांनी अमेरिकेतच राहावे आणि आंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा असा सल्ला दिला आहे. तसेच अमेरिकेबाहेर असलेल्या एच-१बी व्हिसाधारकांनी उद्या रात्री १२ वाजण्यापूर्वी परत येण्यास सांगितलं आहे.
एच-1बी हा अमेरिकेतील नॉन-इमिग्रंट व्हिसा असून त्याद्वारे अमेरिकन कंपन्यांना परदेशी कामगारांना विशेष कौशल्याच्या नोकऱ्यांसाठी नियुक्त करण्याची परवानगी मिळते. यात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित (STEM) आणि आयटीसारख्या क्षेत्रांचा समावेश होतो. या व्हिसासाठी किमान बॅचलर पदवी आवश्यक आहे.