Microsoft CEO Satya Nadella  
आंतरराष्ट्रीय

Microsoft Layoffs | 'मायक्रोसॉफ्ट'मध्ये दुसरी मोठी नोकरकपात; तब्बल ६ हजार जणांना नारळ, कारण काय?

'मायक्रोसॉफ्ट'मधील नोकरकपातीचा हजारो कर्मचाऱ्यांना फटका, महत्त्वपूर्ण बदलांचे दिले संकेत

दीपक दि. भांदिगरे

Microsoft Layoffs

मायक्रोसॉफ्ट कंपनीने दुसरी मोठी नोकरकपात जाहीर केली आहे. जागतिक स्तरावरील कर्मचाऱ्यांपैकी ३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले जाईल. याचा परिणाम सर्व स्तरावरील टीममधील हजारो कर्मचाऱ्यांवर जाणवेल. या नोकरकपातीच्या या फेरीत सुमारे ६ हजार कर्मचारी असतील, असे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

मायक्रोसॉफ्टमध्ये एकूण २ लाख २८ हजार कर्मचारी काम करतात. दरम्यान, व्यवस्थापन स्तर कमी करणे आणि कामकाज सुलभ करण्याच्या उद्देशाने ही नोकरकपात केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

"गतिमान बाजारात कंपनीला यशस्वी करण्यासाठी गरजेच्या असलेल्या संघटनात्मक बदलाची आम्ही कार्यवाही करत आहोत," असे मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने सीएनबीसी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

मायक्रोसॉफ्टचा AI वर अधिक भर

ही नोकरकपातीचा विशेषतः मध्यम व्यवस्थापन पदावरील कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. बिझनेस इनसाइडरने याआधी दिलेल्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्ट कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित यंत्रणेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असून त्यांचा अभियांत्रिकी प्रतिभेला प्राधान्य देण्याचे उद्देश आहे.

बिझनेस इनसाइडरने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कामावरुन कमी करण्यात आलेले कर्मचारी ६० दिवसांपर्यंत पेरोलवर राहतील. त्याव्यतिरिक्त त्यांना रिवॉर्ड्स आणि बोनसचा लाभ मिळेल.

मायक्रोसॉफ्टच्या परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीममध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांच्या पार्श्वभूमीवर ही नोकरकपात करण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीने कामगिरीच्या आधारावर काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षांची पुनर्भरती बंदी लागू केली आहे.

सत्या नडेला यांच्याकडून बदलाचे संकेत

विशेष म्हणजे एप्रिलमधील मायक्रोसॉफ्टच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या तिमाही कमाई निकालानंतर ही नोकरकपात जाहीर करण्यात आली. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी, नॉन-एआय अझ्यूर क्लाउडमधून महसूलात अपेक्षेपेक्षा कमी वाढ मिळाल्यानंतर कंपनी विक्री कार्यवाहीत बदल करेल असे संकेत दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT