मृत्यूच्या दारात नेतंय एकटेपण file photo
आंतरराष्ट्रीय

मृत्यूच्या दारात नेतंय एकटेपण

कर्करोग ते हृदयविकारमार्गे डायबेटिस : शास्त्रीय संशोधनात सिद्ध

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबीयांशी कनेक्ट असणे केवळ तुमच्या मानसिक आरोग्यासाठीच चांगले असते असे नाही, तर ते तुम्हाला हृदयविकार, पक्षाघात आणि टाईप २ डायबेटिस यांसारख्या आजारांपासून तुमचे रक्षण करते, असे एका नव्या संशोधनात सिद्ध झालंय.

इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठ आणि चीनमधील फुदान विद्यापीठाने ४२ हजार प्रौढ व्यक्तींच्या रक्त नमुन्याच्या तपासणीअंती हा निष्कर्ष काढला आहे. सामाजिक एकटेपणा हा तुमच्या रक्तातील काही प्रथिनांना कार्यान्वित करतो. ही प्रथिने दाह, चिडचिडेपणा, रोगनियंत्रण प्रतिसाद आणि भावनांचे नियंत्रण यावर विपरीत परिणाम करतात. या साऱ्या घटकांमुळे गंभीर आजार उद्भवू शकतात. सामाजिक एकटेपण हे तुमच्या मर्यादित सामाजिक संबंध आणि उपक्रमातील सहभागाशी संबंधित असते. तर एकटेपण हा एकटे रहावे या व्यक्तिगत भावनेचा भाग असतो. जरी हे दोन्ही वेगळे असले तरी, 'नेचर ह्यूमन बिहेव्हियर' या प्रतिष्ठित नियतकालिकांत आलेल्या शोधनिबंधात या दोन्हीचा परिणाम अयोग्य प्रथिनांवर सारखाच होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सामाजिक एकटेपणामुळे १८५ प्रथिने तर एकटेपणामुळे २६ प्रथिने कार्यान्वित होतात. ती एकमेकांना आच्छादित करतात. या प्रथिनांमुळे सूज येणे, दाह होणे आणि मधुमेह आणि हृदयविकारासारखे गंभीर होण्याची भीती असते. या प्रथिनांमधील एक महत्त्वाचे प्रथिन म्हणजे एडीएम. ते तणाव आणि ऑक्सिटोसीनसारखी हार्मोन्स नियंत्रित करतं. या हार्मोन्सला लव्ह हार्मोन्स असेही म्हटले जाते. एडीएम अधिक प्रमाणात वाढल्याने त्याचा परिणाम भावनिक आणि सामाजिक प्रक्रिया करणाऱ्या छोट्या मेंदूवर होतो. त्यामुळे अपमृत्यू ओढवू शकतो. आणखी एक प्रथिन आयएसजीआर १. त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. अन्य काही प्रथिनांची ओळख पटली असून ते इन्शुलिनला प्रतिबंध आणि रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवण्याचे काम करतात तर काही प्रथिने कर्करोग वाढीला अनुकूल ठरतात.

सामाजिक एकारलेपण आणि एकटेपण यांचा प्रकृतीवर परिणाम होतो, हे आम्हाला माहिती होते. पण त्याचे नेमके कारण उघड झाले नाही. आमच्या जैवशा- स्त्रावर सामाजिक संबंध कसे परिणाम करतात हे या प्रथिनांच्या संशोधनांमुळे सिद्ध झाले आहे.

- डॉ. चुन शेन, प्राध्यापक केंब्रिज विद्यापीठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT