अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डी. सी. : बिल गेट्स यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी मेलिंडा गेट्स बिल यांचेे जेफ्री एपस्टिनच्या असलेल्या कथित संबंधाने पूर्णपणे दुखावल्या आहेत. त्यांच्या घटस्फोटाचे ते एक प्रमुख कारण मानले जाते. सामाजिक कार्यासाठी उदार हस्ते लाखो डॉलर्सच्या देणग्या देणार्या मेलिंडा या अब्जाधीश असल्या तरी बिल गेट्स यांचे वर्तन त्यांना चीड आणणारे ठरले आहे.
लैंगिक गुन्हेगार म्हणून बदनाम झालेल्या जेफ्री एपस्टिनशी संबंधित नव्या कागदपत्रांमध्ये त्यांचे भूतपूर्व पती, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचे नाव आल्याने आपल्या आयुष्यातील अतिशय वेदनादायक काळाच्या जखमेची खपली पुन्हा निघाली आहे, असे त्यांना वाटते. एनपीआरच्या एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्याला या प्रकाराने कल्पनेपलीकडचे दुःख झाले आहे, असे म्हटले आहे. या प्रकरणात जे काही अनुत्तरित प्रश्न अजून उरले आहेत त्यांची उत्तरे त्या नोंदींमध्ये नाव असलेल्या लोकांनी म्हणजे माझ्या भूतपूर्व पतीसह संबंधितांनी द्यायला हवीत, अशीही आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे.
या सगळ्या घाणेरड्या गोष्टींपासून दूर राहण्यात मला खूप आनंद आहे, असेही त्या म्हणाल्या. या दाम्पत्याने 2021 मध्ये घटस्फोट घेतला. अमेरिकेच्या न्याय विभागाने जाहीर केलेल्या नोंदींमध्ये गेट्स यांना लैंगिक संबंधांतून संसर्गजन्य आजार झाला होता, असा एपस्टिन यांचा आरोप असल्याचा उल्लेख आहे. तथापि, गेट्स यांच्या प्रवक्त्याने हा दावा पूर्णपणे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.
एनपीआरच्या वाईल्ड कार्ड पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मेलिंडा गेट्स म्हणाल्या, माझ्यासाठी, जेव्हा जेव्हा ते तपशील समोर येतात तेव्हा वैयक्तिकद़ृष्ट्या त्यांना सामोरे जाणे खूप कठीण जाते. कारण, त्यामुळे माझ्या वैवाहिक आयुष्यातील अतिशय वेदनादायक काळाच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. त्यांच्याशी (बिल गेट्स) संबंधित जे प्रश्न आहेत ते नेमके काय, हे सगळे मला माहीतही नाही. त्यांची उत्तरेही त्यांनाच द्यावी लागतील, मला नाही.
अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गेट्स दाम्पत्य 27 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर विभक्त झाले. विभक्त होण्यापूर्वी मेलिंडा गेट्स या आपल्या पतीच्या एपस्टिनशी असलेल्या संबंधांबद्दल अस्वस्थ होत्या. विभक्त होण्याची घोषणा झाल्यानंतर, बिल गेट्स यांनी 2019 मध्ये मायक्रोसॉफ्टमधील एका कर्मचार्याशी संबंध (अफेअर) असल्याचे मान्य केले.