पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडाचे (Canada) पंतप्रधान म्हणून जस्टिन ट्रूडो यांची जागा आता मार्क कार्नी (Mark Carney) घेतील. मार्क कार्नी यांची लिबरल पक्षाच्या नेतेपदी आणि कॅनडाचे २४ वे पंतप्रधान म्हणून सोमवारी घोषणा करण्यात आली. लिबरल पक्षाचे अध्यक्ष सचित मेहरा यांनी लिबरल पक्षाच्या (Liberal Party) नेतेपदी यूके आणि कॅनडा सेंट्रल बँकेचे माजी प्रमुख मार्क कार्नी यांचे नाव निश्चित केले. विशेष म्हणजे कार्नी हे राजकीय पार्श्वभूमी नसलेले पहिले पंतप्रधान आहेत.
लिबरल पक्षनेतेपदी ट्रुडो यांच्यानंतर कार्नी यांचे नाव आघाडीवर होते. पक्षनेतेपदाची निवडणूक मार्क कार्नी यांनी १,३१,६७४ मतांसह जिंकली. ही मतांची टक्केवारी एकू मतांच्या सुमारे ८५.९ टक्के आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी क्रिस्टिया फ्रीलँड यांना ११,१३४, करीना गौल्ड यांना ४,७८५ आणि फ्रँक बेलिस यांना ४,०३८ मते मिळाली.
सुरुवातीच्या भाषणात, मार्क कार्नी यांनी कॅनडाचे वर्णन मजबूत देश असे केले. "तुम्ही गेल्या काही वर्षांत आणि आताही मला आर्थिक जबाबदारी, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय नेतृत्वाची संधी दिल्याने मला एक प्रेरणास्त्रोत मिळाला," असे ते म्हणाले. सध्याच्या घडीला, कॅनडावासीयांनी कॅनडासाठी उभे राहणे आवश्यक आहे. लिबरल पक्ष मजबूत आणि एकजूट आहे आणि एक चांगले राष्ट्र निर्माण करण्यासाठी लढण्यास सज्ज आहे, असेही आश्वासन त्यांनी दिले.
कार्नी यांच्याकडे आर्थिक क्षेत्रात दीर्घकाळ कामाचा अनुभव आहे. त्यांनी गोल्डमन सॅक्समध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी तेथे १३ वर्षे काम केले. ऑक्सफर्डमधून पीएचडी पूर्ण केल्यानंतर, कार्नी यांनी या गुंतवणूक बँकेत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी बोस्टन, लंडन, न्यूयॉर्क, टोकियो आणि टोरंटो यासारख्या जगातील मोठ्या शहरांत काम केले. कार्नी यांनी २००८ ते २०१३ दरम्यान बँक ऑफ कॅनडाचे ८ वे गव्हर्नर म्हणून काम पाहिले. २०११ ते २०१८ पर्यंत त्यांनी वित्तीय स्थिरता मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी डील करण्यासाठी कॅनडावासीय कार्नी यांना सर्वात विश्वासार्ह राजकारणी मानतात, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
कार्नी यांनी त्यांच्या दूरदृष्टीने आणि कार्यक्षम नेतृत्वाने कॅनडाची अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली कॅनडाने अनेक आर्थिक आव्हानांना यशस्वीरित्या तोंड दिल्याचे सांगितले जाते. आता पंतप्रधान म्हणून ते कॅनडाला कोणत्या नवीन उंचीवर घेऊन जातात हे पाहणे बाकी आहे.