इस्लामाबाद; वृत्तसंस्था : गेल्या काही काळापासून पश्चिम आशियात धगधगत असलेल्या युद्धाच्या ज्वाळा विझवण्यासाठी शनिवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि हायव्होल्टेज बैठक पार पडली. अमेरिका आणि इराण या दोन कट्टर शत्रू देशांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची स्वतंत्र भेट घेतल्यानंतर प्रत्यक्ष वाटाघाटींना सुरुवात केली. इस्लामाबादमधील सेरेना हॉटेलमध्ये ही चर्चा सुरू असून संपूर्ण परिसराला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लेबनॉनवरील हल्ला तत्काळ थांबवण्याच्या मागणीवर इराण सुरुवातीपासून आग्रही राहिला.
1979 मध्ये झालेल्या इराणच्या इस्लामिक क्रांतीनंतर 47 वर्षांनी दोन्ही देशांच्या नेत्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर समोरासमोर चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ होती. शस्त्रसंधी चर्चेच्या दोन फेर्या यशस्वी झाल्या तिसरी फेरी रात्री उशिरापयर्र्ंत सुरू होती. या बैठकीत तज्ज्ञांनी सुरक्षा, राजकारण, लष्कर, अर्थव्यवस्था आणि कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा केली. अमेरिकेच्या बाजूने उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स, तर इराणच्या बाजूने संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर घालिबाफ यांनी नेतृत्व केले.
दोन्ही बाजूंनी लेखी मसुदे सादर
‘दि डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामाबाद येथे इराण आणि अमेरिकेच्या तज्ज्ञांच्या पथकांमध्ये अनेक तास प्रत्यक्ष चर्चा झाली. या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांना लेखी मसुदे सादर केले आहेत.
तत्पूर्वी, इराण सरकारने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तज्ज्ञ स्तरावर चर्चा पार पडली. यामध्ये आर्थिक, लष्करी, कायदेशीर आणि आण्विक समित्यांचा समावेश होता. तांत्रिक तपशिलांना अंतिम स्वरूप देण्यासाठी सेरेना हॉटेलमध्ये वाटाघाटी सुरू आहेत.
गंभीर परिणाम भोगावे लागतील : ट्रम्प
चर्चेची प्रक्रिया सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराणला इशारा दिला आहे. इराणी लोकांकडे वाटाघाटी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. चर्चा फिस्कटली तर इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील. आम्ही होर्मुझ खुली करण्याचे काम सुरू केलेले आहे. त्यांच्या सुरुंग पेरणार्या बोटी कधीच तळाशी विसावल्या आहेत. आता त्यांच्याकडे काहीच उरलेले नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.