इंफाळ; वृत्तसंस्था : मणिपूरमधील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हत्येचे तीव्र पडसाद बुधवारी दुसर्या दिवशीही पाहायला मिळाले. या घटनेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. दरम्यान, मणिपूर सरकारने राज्यातील डोंगरी आणि पहाडी भागात आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर अॅक्ट (अफ्स्पा) हा लष्करी कायदा आणखी सहा महिन्यांसाठी लागू केला आहे. राज्य अशांत क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या हत्येनंतर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे 'अफ्स्पा' कायद्यास आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. मणिपूरमध्ये अशांतता पसरली असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 'अफ्स्पा' कायद्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्यपालांनी दिली. 'अफ्स्पा'मधून राज्यातील 19 पोलिस ठाण्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या पोलिस ठाण्यांतील हद्दीत कारवाई करण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्स दलास पोलिस विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट, पीपल्स लिबरेशन आर्मीसह अन्य दहशतवादी संघटना सक्रिय होण्याची शक्यता असल्याने आणखी सहा महिने लष्कराचा विशेष कायदा लागू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन विद्यार्थ्यांच्या क्रूर हत्येचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी निदर्शने सुरू असून, आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्यानंतर बुधवारी सायंकाळी सीबीआयचे पथक मणिपुरात दाखल झाले. हत्या करण्यात आलेले दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असून, ते 6 जुलैपासून बेपत्ता होते. त्यांची नावे हिजाम लिनथोईंगंबी (वय 17) आणि फिजाम हेमजित (20) अशी आहेत. हिजाम या मुलीचे फिजामवर प्रेम होते. दोघे पळून गेले होते.
गुवाहाटी ः आसाम आणि मेघालय यांच्यातील सीमावादाने पुन्हा हिंसक वळण घेतले असून, सीमेजवळील गावात जोरदार चकमक झाली. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर धनुष्यबाण आणि गोफणीने हल्ले करण्यात आले. याचा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाला. मेघालयातील पश्चिम जयंतिया हिल्स जिल्हा आणि आसाममधील पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लपंगप गावात ही चकमक झाली. दोन्ही राज्यांतील पोलिस पथकांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक लोकांना शांत केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. बुधवारी परिस्थिती नियंत्रणात; पण तणावपूर्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, येत्या ऑक्टोबरमध्ये सीमाप्रश्नी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे.