सिंगापूर : सिंगापूरमध्ये एका मोलकरणीला अतिरिक्त पगारासाठी दुसरीकडे काम करणे चांगलेच महागात पडले आहे. आपल्या अधिकृत नोकरीव्यतिरिक्त चोरून लपून इतर ठिकाणी सफाईचे काम करणार्या या महिलेला सिंगापूरच्या न्यायालयाने तब्बल 13 हजार सिंगापुरी डॉलर म्हणजेच सुमारे 8.8 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एवढेच नाही तर प्रशासनाने तिला बेकायदेशीरपणे कामावर ठेवणार्या मालकावरही कारवाई केली असून, त्याला 7 हजार सिंगापुरी डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ही मोलकरीण एकाच वेळी अनेक ठिकाणी काम करत असल्याची माहिती मानव संसाधन मंत्रालयाला मिळाली. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. 53 वर्षीय पिडो अर्लिंडा ओकॅम्पो ही 1994 पासून सिंगापूरमध्ये कायदेशीर व्हिसावर काम करत होती. या कामातून तिला दरमहा 375 सिंगापुरी डॉलर (सुमारे 31 हजार रुपये) मिळत होते. सिंगापूरमध्ये परदेशी घरगुती कामगारांसाठी अत्यंत कठोर नियम आहेत. या नियमांनुसार कोणताही कामगार त्याच्या अधिकृत मालकाव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी काम करू शकत नाही.