लंडन : भारतीय वंशाचे प्रसिद्ध ब्रिटिश उद्योगपती, कपारो ग्रुपचे संस्थापक आणि हाऊस ऑफ लॉर्डस्चे सदस्य लॉर्ड स्वराज पॉल यांचे गुरुवारी लंडनमध्ये निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने ब्रिटनमधील भारतीय समुदायावर आणि जागतिक उद्योगविश्वावर शोककळा पसरली आहे. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही काळापासून ते आजारी होते आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेरच्या क्षणी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत होते.
पंजाबमधील जालंधर येथे जन्मलेले लॉर्ड स्वराज पॉल यांनी 1960 च्या दशकात ब्रिटनमध्ये स्थलांतर केले. तिथे त्यांनी कपारो ग्रुप या पोलाद आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीची स्थापना केली. आज या कंपनीचे मुख्यालय लंडनमध्ये असून ब्रिटन, उत्तर अमेरिका, भारत आणि मध्य पूर्वमध्ये 40 हून अधिक ठिकाणी तिचा विस्तार आहे.
लॉर्ड स्वराज पॉल यांच्या निधनाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. स्वराज पॉल यांच्या निधनाने खूप दुःख झाले. उद्योग, समाजसेवा आणि भारत-ब्रिटन संबंध द़ृढ करण्यासाठी त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील, असे मोदींनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
लॉर्ड पॉल यांचे जीवन केवळ उद्योगापुरते मर्यादित नव्हते, तर समाजकार्यातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या लहान मुली अंबिकाच्या कर्करोगाने निधन झाल्यानंतर त्यांनी अंबिका पॉल फाऊंडेशनची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी जगभरातील मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी कोट्यवधी रुपयांची देणगी दिली. लंडन प्राणी संग्रहालयातील अंबिका पॉल चिल्ड्रन्स झू हे त्यांच्या कार्याचे उत्तम उदाहरण आहे. पत्नी अरुणा आणि मुलगा अंगद यांच्या निधनानंतरही त्यांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक सामाजिक उपक्रम राबवले.