पुढारी ऑनलाईन डेस्क
लंडनमधील गेली ९९ वर्षे अव्याहतपणे सुरु असलेले एक रेस्टॉरंट आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. ‘विरस्वामी’ नावाचे हे रेस्टॉरंट गेली ९९ वर्षे लंडनवासीयांना व लंडनस्थित भारतीयांना अस्सल भारतीय व्यंजनांचा स्वाद चाखवत आहे. हे रेस्टॉरंट लंडनमधील खाद्यपरंपरेतील ठळक नाव असलेले आहे. अनेक राजकीय नेते, अभिनेते विषेश म्हणजे अनेक रॉयल फॅमिलीनेही येथिल खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे. यामध्ये राणी एलिजाबेथ द्वितीय यांचाही समावेश आहे. आता या रेस्टॉरंटचा विषय समोर येण्याचे कारण म्हणजे हे लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
कारण हे विरस्वामी रेस्टॉरंट ज्या बिल्डिंगमध्ये आहे त्या मालकी असलेल्या द क्राऊन इस्टेट या संस्थेन त्यांचा भाडेपट्टा नूतनीकरण न करण्याचे ठरवले आहे. या कंपनीने जून ची डेटलाईन या रेस्टॉरंटला दिली आहे. त्यामूळे लवकरच हे उपहारगृह बंद होण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये ‘मिशिलीन स्टार’ या पुरस्काराने या रेस्टॉरंटचा गौरव झाला आहे.
१९२६ मध्ये या उपहागृहाची स्थापना एडवर्ड पाल्मर यांनी स्थापन केले. एडवर्ड हे भारताचे पहिले गव्हर्नर-जनरल वॉरेन हेस्टिंग्ज यांचे खाजगी आणि लष्करी सचिव असलेल्या जनरल विल्यम पाल्मर यांचे नातू होते. तसेच एडवर्ड यांची आजी म्हणजे मुघल राजघराण्यातील राजकुमारी फैज उन निसा बेगम या होत्या. त्यांचा लक्ष्य होते ब्रिटीश लोकांना भारतीय व्यजंनाची ओळख करुन देणे.
दरम्यान काही कारणांनी १९३४ मध्ये एडवर्ड पाल्मर यांनी हे रेस्टॉरंट सर विल्यम स्टुर्अड यांना विकले. त्यांनी खऱ्या अर्थाने या रेस्टॉरंटला ओळख मिळवून दिली. त्यांनी भारत व आसपासचे अनेक देश पालथे घातले व नवनवीन पाककला, कलाकृती व सेवकवर्ग निवडला. आणि भारतीय जेवणाची ओळख लंडनवासीयांना करुन दिली. त्यानंतर १९६० मध्ये या रेस्टॉरंटची मालकी परत बदलली. यावेळी रिब्रॅन्ड्ट हॉटेलने हे रेस्टॉरंट विकत घेतले. सध्या हे रेस्टॉरंट नमिता पंजाबी व रणजित मथराणी यांच्या मालकीचे आहे.
१९२६ पासून सुरु झालेल्या या रेस्टॉरंटरला अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे. यामध्ये लंडनचे माजी पंतप्रधान विंस्टन चर्चिल, भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, चार्ली चॅप्लिन, मार्लन ब्रॅन्डो ही काही त्यातील निवडक नावे. तर या रेस्टॉरंटने बकिंगहॅम पॅलेस मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी राणि एलिजाबेथ द्वितीय यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषविले होते.
या इमारतीची मालकी असलेले द क्राऊन यांनी विरस्वामी रेस्टॉरंटला भाडेकरार वाढवण्यास नकार दिला आहे. त्यांना या जागेचे नूतनीकरण करुन त्याठिकाणी ऑफिसेसे व दुकानगाळे बांधायचे आहेत. त्यामुळे त्यांनी विरस्वामीला जून पर्यंतची मूदत दिली आहे. त्यामुळे जून नंतर कदाचित हे रेस्टॉरंट बंद होईल.
सह-मालक रणजित मथराणी यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले आहे. मथराणी म्हणाले की, ही सूचना अनपेक्षित होती, विशेषतः वर्षभरापूर्वी इस्टेटने त्यांना अतिरिक्त जागा देऊ केली होती पण त्यांच्या मते योग्य जागा शोधण्यासाठी त्यांना कमीत कमी दोन वर्षाचा वेळ हवा आहे. मथराणी यांनी म्हटले आहे की क्राऊन च्या या निर्णयावर राजघराणेही खूष नसेल.
क्राऊन इस्टेट म्हणजे राजाच्या मालकीचे, ही एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेकडे लंडनमधील अनेक मोक्याच्या जागा आहेत. रिअल इस्टेट कंपन्यांना त्या जागा ही संस्था भाडेकराराने वापरण्यास देते. त्याबदल्यात मिळालेला महसूल सरकारच्या तिजोरीत जातो व त्यातून राजघराण्यालाही वाटा दिला जातो.