वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन
गेली वर्षभर कोरोना विषाणूने संपूर्ण मानवजातीस वेठीस धरले आहे. यावरील औषधासाठी युद्धपातळीवर संशोधनही सुरु आहे. यातूनच एक नवे संशोधन समोर आले आहे. आळशी लोकांना कोरोनाची लागण झाल्यास यातील बहुतांश जणांवर रुग्णालयात उपचार करावे लागतात. त्याचबरोबर अशा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोकाही अधिक असतो, असा निष्कर्ष ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनातून काढण्यात आला आहे. अशा स्वरुपाचे संशोधन कॅलिफोर्निया विद्यापीठातही झालं आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या कालवधीमध्ये ४८ हजार ४४० रुग्णांची पाहणी करण्यात आली. त्यांचे सरासरी वय ४७ होते. तर बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) हा ३१ इतका होता. ज्यांच्या जीवनशैलीत व्यायामाचा अभाव आहे, अशा २० टक्के आळशी व्यक्तींना रुग्णालयात दखल करावे लागते. तर १० टक्के रुग्णांवर थेट अति दक्षता विभागातच उपचार करावे लागतात. कोरोना झालेल्या आळशी लोकांचा मृत्यू होण्याची शक्यताही अडीच पट अधिक आहे. तर आठवड्यातून सुमारे १५० मिनिटे व्यायाम करणारी व्यक्ती अधिक सक्षमपणे कोरोनाचा मुकाबला करु शकते, असा निष्कर्षही संशोधनात नोंदविण्यात आला आहे
ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, अवयव प्रत्यार्पण शस्त्रक्रिया झालेले, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि कर्करोग आदी व्याधी झालेल्यांपेक्षा शारीरिक हालचाली न करणार्यांना कोरोना संसर्ग होण्याचा आणि त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो, असेही निरीक्षण संशोधनात नोंदवण्यात आले आहे. मात्र हे संशोधन अद्याप प्राथमिक अवस्थेतील आहे. हा निष्कर्ष सर्वच आळशी व कमी शारीरिक हालचाली करणार्यांना लागू होत नाही, असे अमेरिकेतील एका वैद्यकीय संशोधन केंद्राने म्हटले आहे.