नूह; वृत्तसंस्था : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासादरम्यान एनआयएने आणखी एक कारवाई केली आहे. यावेळी एनआयएने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली नूंह जिल्ह्यातून एका वकिलाला अटक केली आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास सुरू असतानाच राष्ट्रीय तपास संस्थेची आणखी एक मोठी कारवाई समोर आली आहे. एनआयए आणि पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणातील नूंह जिल्ह्यातून एका वकिलाला अटक केली आहे. आरोपीची ओळख तावडू तालुक्यातील खरखडी गावचा रहिवासी असलेल्या रिझवान, जुबेर याचा मुलगा, अशी झाली आहे. रिझवान गुरुग्राम न्यायालयात वकिली करतो. सूत्रांनुसार, रिझवानचा एक सहकारी वकीलही ताब्यात घेण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू आहे.
रिझवानच्या कुटुंबातील काही सदस्य फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेले होते. तेव्हापासून रिझवान आणि त्याच्या कुटुंबाचे पाकिस्तानात येणे-जाणे सुरू होते. रिझवानही पाकिस्तानात जाऊन आला आहे. त्यानंतर तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात आला. तपास यंत्रणा आता आरोपी रिझवानची चौकशी करत आहेत. तो किती वेळा पाकिस्तानात गेला आणि कोणाच्या मदतीने गेला, याचा शोध घेतला जात आहे.