इस्लामाबाद; वृत्तसंस्था : लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर बिलाल आरिफ सराफीचा शनिवारी पाकिस्तानात ईदच्या नमाजानंतर खात्मा करण्यात आला. विशेष म्हणजे त्याच्याच कुटुंबातील सदस्यांनी भोसकून आणि गोळ्या झाडून त्याला संपवले.
ही घटना मुरीदके येथील मरकझ जवळ असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या उद्ध्वस्त मुख्यालयाजवळ घडल्याचे समजते. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु गुप्तचर सूत्रांना हा कौटुंबिक वाद असल्याचा संशय आहे. हत्येत सामील असलेल्यांना अटक करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोशल मीडियावर या गुन्ह्याशी संबंधित अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये हा दहशतवादी जमिनीवर मृतावस्थेत पडलेला दिसत आहे. मात्र, या व्हिडीओंच्या सत्यतेची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, बिलाल मुरीदके येथील केंद्रात तरुणांची माथी भडकावून दहशतवादी गटात भरती करत होता. त्याने अनेक तरुणांना अशा पद्धतीने गळाला लावले होते.
पाकिस्तानवर टेरर बूमरँग
गेली अनेक दशके पाकिस्तान दहशतवादी गटांना खतपाणी घालत आहे. पाकिस्तान आता स्वतःच त्याचा बळी ठरला आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे.