पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण कुवेतमधील एका इमारतीला लागलेल्या आगीत किमान 41 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 10 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती मिळत असून त्यातील 5 जण हे केरळचे रहिवासी आहेत. या दुर्घटनेत 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ज्या इमारतीत आग लागली तेथे कामगारांचे वास्तव्य मोठ्या संख्येने होते. अशी कुवेती अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
मेजर जनरल ईद रशीद हमद यांनी सांगितले की, 'पहाटे लागलेली आग संपूर्ण इमारतीत पसरली. अनेक लोक इमारतीत अडकले होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, या इमारतीत अनेक स्थलांतरित मजूर राहतात. एकाच खोलीत अनेक लोक राहतात. पैसे वाचवण्यासाठी हे कामगार असे करतात.'
ज्या इमारतीला आग लागली ती केरळमधील एका व्यक्तीची आहे. इमारतीत दक्षिण भारतातील लोकही होते. मृत्युमुखी पडलेल्या दहा भारतीय नागरिकांपैकी पाच जण केरळमधील आहेत. कुवेतचे उपपंतप्रधान फहद युसेफ अल सबाह यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पोलीस तपासाचे आदेश दिले.
एका वरिष्ठ पोलीस कमांडरने सरकारी टीव्हीला सांगितले की, ज्या इमारतीत आग लागली त्या इमारतीत कामगारांची निवासस्थाने होती. अपघाताच्या वेळीही येथे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. डझनभर लोक बचावले पण दुर्दैवाने आगीतून निघणाऱ्या धुरामुळे गुदमरून अनेकांचा मृत्यू झाला, असा खुलासा कुवेतच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे.