रिपब्लिकन नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वन्‍स यांची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे. x
आंतरराष्ट्रीय

एकेकाळी ट्रम्‍प यांना 'हिटलर' म्‍हणणारे वन्‍स उपराष्‍ट्राध्‍यक्षपदाच्‍या शर्यतीत

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी ( दि.१४) पेनसिल्व्हेनिया राज्यात गोळीबार झाला. या घटनेने अमेरिकेसह जगभरात खळबळ माजली. त्‍याचबरोबर अमेरिकेतील निवडणुकाही चर्चेचा विषय ठरल्‍या आहेत. नोव्हेंबर महिन्‍यात अमेरिकेत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ओहायोचे सिनेटर जेडी वन्‍स हे आपले नशीब आजमावणार आहेत. रिपब्लिकन नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वन्‍स यांची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे. एकेकाळी ट्रम्‍प यांच्‍यावर कडवट टीका करणारे जेडी वन्‍स (JD Vance) हे आता ट्रम्‍प यांच्‍याबरोबर आहेत. जाणून घेवूया त्‍यांच्‍या आजवरच्‍या प्रवासाविषयी..

एकेकाळी म्‍हणाले होते, ट्रम्‍प मुर्ख -हिटलर..., आज सर्वात मोठे समर्थक

२०१६ मध्‍ये झालेल्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीवेळी जेडी वन्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी जाहीरपणे ट्रम्‍प यांना मुर्ख असे म्हटले होते. तसेच त्याची तुलना ॲडॉल्फ हिटलरशी केली होती. मात्र आता वन्‍स हे ट्रम्‍प यांचे सर्वात मोठ्या समर्थकांपैकी एक आहेत. इतर अनेक रिपब्लिकन नेते ट्रम्प यांच्यावर टीका करत असतानाही जेडी वन्स ट्रम्प यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

गरीब घरात जन्‍म, इराक युद्धात सहभागी

जेडी वन्‍स यांचा जन्‍म २ ऑगस्ट 1984 रोजी ओहायो राज्‍यातील मिडलटाउन येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्याचे संगोपन त्याच्या आजी-आजोबांनी केले. विशेषत: त्याच्या आजीने. इराक युद्धात ते सहभागी झाले होते. त्यांनी ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर येल लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली. 2016 मध्ये त्याचे 'Hillbilly Elegy' हे आत्मचरित्र बेस्टसेलर ठरले. यावर नेटफ्लिक्सने वेबसीरीजही केली आहे. ओहायो येथे त्याचे संगोपन आणि रस्ट बेल्ट प्रदेशातील कामगार वर्गासमोरील सांस्कृतिक आणि आर्थिक आव्हानांचे वर्णन त्‍यांनी आपल्‍या आत्‍मचरित्रात केले आहे.

भारताशीही आहे खास 'कनेक्‍शन'

३९ वर्षीय जेडी वन्‍स हे एका अर्थाने भारताचे जावई आहेत. भारतीय वंशाच्‍या उषा चिलुकुरी या त्‍यांच्‍या पत्‍नी आहेत. उषा या मूळच्‍या आंध्र प्रदेशमधील आहेत. उषा या भारतीय स्थलांतरितांच्या कन्या आहेत. त्‍या वकील आहेत. न्‍यू यॉर्क टाइम्‍सच्‍या रिपोर्टनुसार, उषा यांनी येल विद्यापीठातून इतिहासात पदवी आणि केंब्रिज विद्यापीठातून तत्त्वज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. यानंतर त्‍यांनी कायद्‍याचे शिक्षण घेतले. कायदेशीर क्षेत्रात एक प्रतिष्ठित वकील म्‍हणून त्‍यांची ओळख आहे. उषा आणि जेडी वन्स यांची पहिली भेट येल लॉ स्कूलमध्ये झाली होती. 2014 मध्ये केंटकीमध्ये त्यांचे लग्न झाले होते. विशेषम्‍हणजे एका हिंदू पुजारीने त्‍यांच्‍या लग्‍नातील धार्मिक विधी केल्‍या होत्‍या.वन्‍स आणि उषा यांना तीन मुले आहेत. जेडी सध्या ओहायोचे सिनेटर आहेत.

वन्‍स यांच्‍याकडे अष्टपैलू प्रतिभा : ट्रम्‍प

2021 मध्ये ट्रम्प यांना भेटल्याचे वन्स सांगतात. सिनेट प्रचारा दरम्‍यान ते ट्रम्‍प यांचे निकटवर्ती झाले. यानंतर त्‍यांनी ओहायोमधील सिनेटच्या जागेसाठी निवडणूक जिंकली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उपराष्‍ट्राध्‍यक्ष पदाच्‍या निवडणुकीत वन्स यांच्या नावाची घोषणा केली. वन्‍स यांनी मरीन कॉर्प्समध्ये अमेरिकेची सेवा केली आहे. ते एक उत्तम लेखक अष्टपैलू प्रतिमा असणारे व्‍यक्‍ती आहेत, असे ट्रम्प यांनी त्‍यांची उपराष्‍ट्राध्‍यक्ष पदाचे उमेदवार म्‍हणून घोषणा करताना म्‍हटलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT