KitKat Theft Italy
रोम: ईस्टर सणाच्या पार्श्वभूमीवर गोड पदार्थांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता असतानाच इटलीमध्ये किटकॅटच्या तब्बल १२ टन चॉकलेटची चोरी झाली आहे. यामध्ये ४ लाखांहून अधिक चॉकलेट बारचा समावेश आहे. २६ मार्च रोजी चॉकलेटचा ट्रक इटलीहून पोलंडकडे जात असताना ही घटना घडली. या चोरीमुळे बाजारपेठेत किटकॅटच्या नव्या उत्पादनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
इटलीतील कारखान्यातून हे चॉकलेट पोलंडकडे रवाना झाले होते. प्रवासादरम्यान चोरट्यांनी ४,१३,७९३ चॉकलेट भरलेला ट्रक लंपास केला. किटकॅटची मूळ कंपनी असलेल्या 'नेस्ले'ने या वृत्ताला दुजोरा दिला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. अद्याप ट्रक आणि चोरीला गेलेला माल यांचा पत्ता लागलेला नाही.
चोरीला गेलेले चॉकलेट साधेसुधे नसून ते किटकॅटच्या अत्यंत चर्चेत असलेल्या 'फॉर्म्युला वन' या नव्या सिरीजमधील होते. गेल्या वर्षी किटकॅट हा F1 चा अधिकृत चॉकलेट पार्टनर बनला आहे. या विशेष चॉकलेट बारचा आकार रेसिंग कारसारखा असून त्यात किटकॅटचे खास वेफर्स वापरण्यात आले आहेत.
या चोरीनंतर नेस्ले कंपनीने किटकॅटच्या प्रसिद्ध जाहिरातीचा संदर्भ देत विनोदी शैलीत टिप्पणी केली आहे. एका पत्रात म्हटले आहे की, “आम्ही नेहमीच किटकॅटसोबत ब्रेक घ्या असे सांगत आलो आहोत. पण चोरट्यांनी हे खूपच गंभीरपणे घेतले आणि १२ टनांहून अधिक चॉकलेट घेऊनच ब्रेक घेतला.” त्यांनी पुढे म्हटले आहे की, "अशा प्रकारच्या मालवाहतूक चोरीच्या घटना वाढत आहेत आणि गुन्हेगार अधिक प्रगत पद्धती वापरत आहेत. त्यामुळेच जनजागृती व्हावी म्हणून आम्ही हा अनुभव सार्वजनिक केला आहे."