प्योंगयांग; वृत्तसंस्था : देशाच्या सुरक्षेसाठी अण्वस्त्रे आवश्यक असून त्यांचा साठा कायम ठेवला जाईल. उत्तर कोरियाला अण्वस्त्रांचा त्याग करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न म्हणजे ‘मूर्खपणाची गोष्ट’ आहे, असे स्पष्ट मत, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची बहीण किम यो-जोंग यांनी गुरुवारी व्यक्त केले.
व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या महासभेदरम्यान किम यो-जोंग यांचे हे वक्तव्य समोर आले. उत्तर कोरियाने यापूर्वीही अण्वस्त्रांना आपल्या संरक्षण धोरणाचा कायमस्वरूपी भाग मानले आहे. त्यामुळे अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्याची किंवा अण्वस्त्रसाठा नष्ट करण्याची भूमिका स्वीकारली जाणार नसल्याचे प्योंगयांगकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे.
किम यो-जोंग यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाशी पुन्हा चर्चा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात किम जोंग उन यांच्याशी तीन वेळा भेट झाली होती.
उत्तर कोरियाकडे नेमकी किती अण्वस्त्रे आहेत, याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये उत्तर कोरियाकडे ५७ अण्वस्त्रे असल्याचा दावा केला होता. स्वीडनच्या सिप्री संस्थेच्या अंदाजानुसार उत्तर कोरियाकडे सुमारे ६० अण्वस्त्रे आहेत; तर दक्षिण कोरियाच्या अंदाजानुसार हा आकडा ८० ते १२० दरम्यान असू शकतो.