APEC Summit | अणुयुद्ध जिंकता येत नाही, ते कधीही लढले जाऊ नये 
आंतरराष्ट्रीय

APEC Summit | अणुयुद्ध जिंकता येत नाही, ते कधीही लढले जाऊ नये

ट्रम्प, जिनपिंग, पुतीन यांच्यात ‘शांततेचा जाहीरनामा’ मंजूर

पुढारी वृत्तसेवा

शेन्झेन (चीन); वृत्तसंस्था : अण्वस्त्र जोखीम कमी करणे, अण्वस्त्र प्रसार रोखणे आणि जागतिक धोरणात्मक स्थिरता कायम ठेवणे यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात एकमत होत गुरुवारी (दि. १९) पहिल्यांदाच त्रिपक्षीय शिखर बैठकीत ‘शांततेचा संयुक्त जाहीरनामा’ मंजूर केला. दक्षिण चीनमधील शेन्झेन शहरात आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेच्या निमित्ताने ही महत्त्वाची बैठक पार पडली. तिन्ही महासत्तांच्या नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. जागतिक राजकारणात या ऐतिहासिक घडामोडीची नोंद झाली.

सुमारे ९० मिनिटे चाललेल्या या चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त जाहीरनाम्यात, अणुयुद्ध कधीही जिंकता येत नाही आणि ते कधीही लढले जाऊ नये, या तत्त्वाचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. ‘क्रेमलिन’ आणि चीनच्या सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या या निवेदनानुसार, अण्वस्त्रांचा धोका टाळण्यासाठी आणि त्यांचा प्रसार रोखण्यासाठी तिन्ही देश सातत्याने संवाद साधण्यास राजी झाले आहेत. या त्रिपक्षीय बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्याशी सुमारे तासभर, तर पुतीन यांच्याशी सुमारे ४० मिनिटे स्वतंत्र चर्चा केली.

संयुक्त राष्ट्र सुधारणा, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयावर भाष्य

जागतिक आव्हानांचा अधिक प्रभावीपणे सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रेत सुधारणा करण्याचे आश्वासन तिन्ही नेत्यांनी दिले आहे. तसेच, शुद्धिकृत पेट्रोलियम उत्पादनांचे उत्पादन आणि पुरवठा वाढवण्याबरोबरच जागतिक ऊर्जापुरवठा साखळी स्थिर ठेवण्यावरही एकमत झाले. या जाहीरनाम्यातील सर्वात लक्षवेधी मुद्दा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाबाबत (आयसीसी) आहे. कोणत्याही देशाची संमती आणि राष्ट्रप्रमुखांचे विशेषाधिकार महत्त्वाचे असून, ‘आयसीसी’ किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय संस्थांनी आपल्या अधिकार क्षेत्राचा गैरवापर करू नये, अशी ठाम भूमिका तिन्ही देशांनी मांडली आहे. युक्रेनमधील युद्धगुन्ह्यांच्या आरोपाखाली ‘आयसीसी’ने पुतीन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले असल्यामुळे हा मुद्दा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

ऐतिहासिक शांतता जाहीरनामा : ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन यांनी चीनमधील शेन्झेन येथे पहिल्यांदाच त्रिपक्षीय बैठक घेत अण्वस्त्र जोखीम कमी करण्यासाठी ‘शांततेचा संयुक्त जाहीरनामा’ मंजूर केला.

अणुयुद्ध टाळण्यावर भर : ‘अणुयुद्ध कधीही जिंकता येत नाही आणि ते कधीही लढले जाऊ नये,’ या तत्त्वाचा पुनरुच्चार करत तिन्ही महासत्तांनी अण्वस्त्र प्रसार रोखण्याचे व संवाद सुरू ठेवण्याचे मान्य केले.

संयुक्त राष्ट्रे सुधारणा आणि ‘आयसीसी’वर भाष्य : संयुक्त राष्ट्र संघात सुधारणा करणे, ऊर्जापुरवठा स्थिर ठेवणे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने अधिकार क्षेत्राचा गैरवापर करू नये, यावर तिन्ही नेत्यांचे एकमत झाले.

युक्रेन-इराण युद्धाचा उल्लेख टाळला : बैठकीत चर्चा होऊनही अंतिम जाहीरनाम्यात युक्रेन आणि इराण संघर्षाचा थेट उल्लेख टाळण्यात आला, तसेच झेलेन्स्कींच्या अनुपस्थितीमुळे युरोपीय देशांनी चिंता व्यक्त केली.

‘चीनची हेरगिरी मान्य; पण आम्ही हेरगिरीत सरस’

शेन्झेन (चीन) : चीन अमेरिकेवर हेरगिरी करतो, हे मान्य करतानाच अमेरिकाही चीनवर तितकीच किंबहुना त्याहून अधिक प्रभावी हेरगिरी करते, अशी जाहीर कबुली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. शेन्झेन येथे 'एपेक' शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत होणाऱ्या त्रिपक्षीय बैठकीपूर्वी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले.

ते म्हणाले की, ते आपल्यावर हेरगिरी करतात आणि आपणही त्यांच्यावर करतो. किंबहुना आपण त्यांच्यापेक्षा चांगली हेरगिरी करतो. आपण काय करतो हे मी सांगू शकत नाही, पण दोन्ही देश एकमेकांवर पाळत ठेवतात. त्यामुळे मी त्यांना थांबायला सांगितले, तर ते मलाही थांबायला सांगतील आणि मी ते थांबवेन की नाही, हे मला माहीत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT