केनेडी ते शिंजो आबे...! जगातील मोठ्या नेत्यांवर झाला होता प्राणघातक हल्ला  File Photo
आंतरराष्ट्रीय

Donald Trump | केनेडी ते शिंजो आबे...! जगातील मोठ्या नेत्यांवर झाला होता प्राणघातक हल्ला

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका रॅलीदरम्यान झालेल्या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. डोनाल्ड ट्रम्प या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. मात्र, या हल्ल्यात ट्रम्प जखमी झाले आहेत. ट्रम्प यांच्यावर हा हल्ला पेनसिल्व्हेनियातील बटलरमध्ये झाला. रॅलीदरम्यान झालेल्या गोळीबारात ट्रम्प समर्थकाचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. प्रसिद्ध जागतिक नेत्यावर झालेला हा पहिला हल्ला नाही. याआधीही विविध देशांच्या बड्या नेत्यांवर आणि पंतप्रधानांवरही प्राणघातक हल्ले झाले आहेत.

स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांवर प्राणघातक हल्ला

या वर्षी मे महिन्यात स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हल्लेखोराने फिकोंवर अनेक राऊंड गोळीबार केला होता. या हल्ल्यात फिको गंभीर जखमी झाले. फिकोंवर हल्ला राजधानी ब्रातिस्लाव्हापासून सुमारे 180 किलोमीटर अंतरावर हँडलोव्हा येथे झाला, जेव्हा पीएम फिको सरकारी बैठक संपल्यानंतर सांस्कृतिक समुदाय केंद्रात लोकांना अभिवादन करत होते.

अशा प्रकारच्या हल्ल्यात जपानच्या पंतप्रधानांना जीव गमवावा लागला होता

8 जुलै 2022 रोजी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात आबे यांचा मृत्यू झाला होता. आबे हे नारा शहरात एका सभेला संबोधित करत असताना हल्लेखोराने त्यांना लक्ष्य केले. हल्लेखोराने आबे यांच्यावर दोन राऊंड गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर आबे यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही हल्ला

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर एका रॅलीदरम्यान जीवघेणा हल्ला झाला. इम्रान खानवर हा हल्ला ३ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला होता. या हल्ल्यात इम्रान खानच्या पायाला गोळी लागली होती. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या हल्ल्यात इम्रान खान व्यतिरिक्त १४ जण जखमी झाले होते.

जॉन एफ केनेडी यांचीही हत्या झाली

अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची २२ नोव्हेंबर १९६३ रोजी हत्या झाली. केनेडींवर हल्ला झाला तेव्हा ते त्यांच्या मोकळ्या कारमधून कुठेतरी जात होते. दरम्यान, हल्लेखोराने त्यांच्यावर अनेक राऊंड गोळीबार करून त्यांची हत्या केली.

पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचीही हत्या

पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचीही 27 डिसेंबर 2007 रोजी हत्या झाली होती. भुट्टो यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्या पाकिस्तानातील रावळपिंडीमध्ये प्रचार करत होत्या. भुट्टो भाषणानंतर निवडणूक रॅलीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना हा हल्ला झाला. दरम्यान हल्लेखोर त्याच्याजवळ आला आणि त्याने गोळ्या झाडल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT