UK PM Keir Starmer Resignation: ब्रिटनच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आपल्या पदाचा तसेच लेबर पार्टीच्या नेतृत्वाचा राजीनामा जाहीर केला आहे. पक्षातील अनेक खासदार आणि नेत्यांकडून त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
राजीनाम्याची घोषणा करताना स्टार्मर म्हणाले की, पुढील सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आपणच योग्य व्यक्ती आहोत का, याबाबत पक्षामध्ये शंका निर्माण झाली होती. पक्षाच्या मताचा आदर करत त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. "आता पक्षाला नव्या नेतृत्वाची गरज आहे आणि तो पुढील निवडणुकीसाठी तयार व्हावा, अशी माझी इच्छा आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
स्टार्मर यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, संसदीय पक्षातील अनेक सदस्यांना त्यांच्या नेतृत्वाबाबत विश्वास वाटत नव्हता. काहींना वाटत होते की आगामी निवडणुकीत ते पक्षाला विजय मिळवून देऊ शकणार नाहीत. त्यामुळे पक्षातील मतांचा सन्मान राखत त्यांनी पदत्यागाचा निर्णय घेतला.
राजीनाम्याच्या वेळी स्टार्मर यांनी आपल्या कार्यकाळातील काही महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख केला. त्यांनी पक्षातील ज्यूविरोधी विचारसरणीला आळा घालण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रीय सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले, असे ते म्हणाले. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानपद स्वीकारणे हा आपल्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्टार्मर यांच्या राजीनाम्यानंतर लेबर पक्ष नवीन नेत्याची निवड करण्यासाठी लवकरच बैठक घेणार आहे. पक्षातील वरिष्ठ नेते अँडी बर्नहॅम हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. त्यांना सुमारे 100 खासदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.
स्टार्मर यांच्या राजीनाम्यामुळे ब्रिटनच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली असून, पुढील काही दिवसांत लेबर पक्षाचे नवे नेतृत्व कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.