पुढारी ऑनलाईन डेस्क : कझाकिस्तानमध्ये 105 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला असून यात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. 105 प्रवासी आणि पाच क्रू सदस्य असलेले विमान बुधवारी (दि.२५) कझाकिस्तानच्या अकताऊ विमानतळाजवळ कोसळले. त्यानंतर विमानाला आग लागली. या अपघातात ४२ प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले की, प्राथमिक अहवालानुसार, सहा जण अपघातातून बचावले आहेत.
या विमान क्रॅशची कझाकस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने पुष्टी केली आहे. ग्रोझनीमध्ये दाट धुक्यामुळे विमान अकताऊकडे वळवण्यात आले होते. अझरबैजान एअरलाइन्सच्या या विमानाने अपघातापूर्वी विमानतळावर अनेक वेळा चक्करा मारल्या होत्या. अपघातातील जीवितहानी किंवा अपघाताचे नेमके कारण याबाबतचा तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकलेला नाही. आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले की कर्मचारी विमानाला लागलेली आग विझवत आहेत.