पुढारी ऑनलाईन : पॉप गायिका केटी पेरीने सोमवारी अमेरिकन उद्योगपती जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या न्यू शेपर्ड रॉकेटमधून काही मिनिटांसाठी अंतराळ प्रवास केला. या उप-कक्षीय अंतराळ प्रवासाची खास गोष्ट म्हणजे ६० वर्षांत प्रथमच सर्व महिला क्रूने अंतराळात प्रवास केला. ११ मिनिटांच्या प्रवासानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर परत उतरणाऱ्या यानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (katy perry)
या व्हिडिओत पाहू शकता की, अंतराळ प्रवासातून परतलेल्या या अंतराळयानाचा दरवाजा उघडला जातो. दरवाजा उघडताच सर्वात आधी लॉरेन सांचेज बाहेर येते. जेफ हात पसरून तिचे स्वागत करतात. यानंतर आनंदात दोघेही गळाभेट करतात. यानंतर केटी पेरी ही कॅप्सूलमधून बाहेर येते. ती हवेत हात उंचाउन पांढरे शुभ्र डेजीचे फुल दाखवते. केटीच्या मुलीचे नावही डेजी आहे. त्यामुळे तीने आपल्या भावना अशा प्रकारे व्यक्त केल्या. केटीनंतर एक-एक महिला या यानातून बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर अंतराळ प्रवासाचा आनंद आणि आपल्या पृथ्वीवर परतल्याचे समाधान अशा भावना दिसून येत होत्या.
अंतराळ प्रवासादरम्यान, या महिलांनी कार्मन रेषा ओलांडली. ही प्रत्यक्षात पृथ्वी आणि अवकाश यांच्यातील एक काल्पनिक रेषा आहे. ही रेषा पृथ्वीचा शेवट आणि अवकाशाची सुरुवात मानली जाते.
ब्लू ओरिजिनच्या मते, अवकाशात प्रवास करणारे ब्लू ओरिजिनचे हे सर्व महिला क्रू मिशन ११ वे मानवयुक्त अंतराळयान होते. १९६३ नंतर पहिल्यांदाच महिलांचे मिशन अंतराळात गेले. ब्लू ओरिजिनच्या या मिशन टूरमध्ये पॉप गायिका केटी पेरी, पत्रकार गेल किंग, नागरी हक्क वकील अमांडा इंगुएन, माजी नासा रॉकेट शास्त्रज्ञ आयशा बोवे आणि चित्रपट निर्मात्या कॅरिन फ्लिन, लॉरेन सांचेझ यांच्यासह सहभागी होत्या.